रोजच्या जगण्याचा खर्च मुंबई-दिल्लीत सर्वाधिक pudhari photo
मुंबई

Mumbai cost of living : रोजच्या जगण्याचा खर्च मुंबई-दिल्लीत सर्वाधिक

कोलकाता हे मेट्रो शहर असूनही स्वस्त

पुढारी वृत्तसेवा

मुंबई ः रोजचा जगण्याचा खर्च किती, या प्रश्नाचे उत्तर सगळीकडे एकसारखे नाही. तुम्ही कुठे, कोणत्या शहरात राहता यावर हा खर्च कमी-अधिक होतो. यंदाच्या ताज्या अहवालानुसार भारतात मुंबई आणि दिल्ली या दोन शहरांत राहण्याचा खर्च सर्वाधिक असून ही दोन्ही मेट्रो शहरे सर्वात महागडी ठरली आहेत. त्या तुलनेत कोलकाता हे मेट्रो शहर असूनही स्वस्त आहे.

घराच्या किमती, घराचे भाडे, प्रवास खर्च आणि रोजचे खाणे-पिणे या निकषावर मुंबई आणि दिल्ली ही दोन्ही महानगरे महागडी तर कोलकाता आणि चेन्नई खिशाला परवडणारी महानगरे होत. मार्च 2026 पर्यंतच्या आकडेवारीनुसार भारतात कुणाही एकट्या माणसाला जगण्यासाठी महिन्याला 27 हजार 300 रुपये लागतात. घरभाडे वेगळे. एका चौकोनी कुटुंबाचा हाच खर्च सरासरी 98 हजार रुपयांवर जातो. त्यात अन्न, रोज लागणारे इतर साहित्य, प्रवास आणि करमणुकीसाठीचा खर्च समाविष्ट आहे.

केवळ घरभाड्यामुळे जगण्याच्या दरमहा खर्चात मुंबई देशात आघाडीवर आहे. कोलकाता मात्र केवळ घरस्वस्ताईमुळे सर्व मेट्रो महानगरांमध्ये परवडणारे ठरते. भारतात जगण्याचा खर्च समजून घ्यायचा असेल तर रोजचा आणि महिन्याचा सरासरी खर्च विचारात घ्यावा लागतो.

उदाहरणार्थ -

  • घरभाडे ः शहराच्या मध्यवर्ती भागात एक बीएचके घर साधारण 14 हजार रुपये भाड्याने मिळते. मध्यवर्ती भागापासून दूर असलेले घर 9 हजारापर्यंत मिळते.

  • किराणा ः एक लिटर दूध 61 रुपये, ब्रेड (500 ग्रॅम) 39 रुपये, तांदूळ (एक किलो) 56 रुपये

  • बाहेरचे खाणे ः परवडणारे जेवण 200 रुपये, मध्यम प्रतीचे जेवण (दोघांचे) 1050 रुपये.

  • प्रवास ः महिना पास 800 रुपये, पेट्रोल (लिटर) 102

  • अन्यखर्च ः 3,565

या आकड्यांवरून खर्चाचा अंदाज येत असला तरी तुमची जीवनशैली आणि शहर यानुसार हे सर्व खर्च कमी-जास्त किंवा जास्तच होतात. त्यातही देखभालीसाठी लागणारा खर्च हा प्रामुख्याने महानगरांच्या प्रतवारीवर अवलंबून आहे. दिल्ली आणि मुंबईत येणारा मेंटेनन्सचा खर्च इतर शहरांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. दिल्लीत हा खर्च 4 हजार रुपयांच्या पुढे जातो. मुंबईतही तो 5 हजारांच्या पुढे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT