Cyber Crime Pudhari
मुंबई

Cyber Crime: शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली देशभरात सायबर फसवणुकीचे जाळे; नागपुरातून मुख्य सूत्रधारासह तीन जणांना अटक

मुंबईतील ६, तर देशभरातील ७३ सायबर गुन्ह्यांची उकल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: शेअर ट्रेडिंग आणि गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून करण्यात येणाऱ्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्याने नागपूर येथून मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक केली.

आरोपींनी बनावट कंपनी स्थापन करून तिच्या नावाने बँक खाते उघडले व सायबर फसवणुकीतून मिळालेली रक्कम या खात्यात वळती केल्याचा आरोप आहे. या कारवाईत मुंबईतील सहा, तर देशभरातील एकूण ७३ सायबर गुन्ह्यांचा छडा लावण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे.

दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ७९/२०२६ च्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. या गुन्ह्यातील फसवणुकीची २४ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम नागपूरमधील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या जरीपटका शाखेतील बनावट कंपनीच्या चालू खात्यात वळती करण्यात आली होती. या प्रकरणी अमित दिलीपराव काळे, रितीक शैलेश धारगावे आणि अनिरुद्ध सतीश उके या तिघांना अटक करण्यात आली.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून 'ग्रेन गार्डन डिलाईट प्रा. लि.' या नावाने कागदोपत्री कंपनी स्थापन केली. कंपनीच्या नावाने बँक खाते उघडण्यासाठी दुकानाचे बनावट भाडेकरार तयार करण्यात आले. त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या जरीपटका शाखेत कंपनीच्या नावाने चालू खाते उघडण्यात आले.

या खात्याशी जोडलेले सिमकार्ड मुख्य आरोपी अमित काळे याने स्वतःच्या मोबाईलमध्ये वापरले. रितीक धारगावे याच्या नावावर असलेला मोबाईल क्रमांक स्वतःच्या POCO C75 5G मोबाईलमध्ये लॉग इन करून त्याद्वारे बँक खात्याशी संबंधित व्यवहार केल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सायबर फसवणुकीतून जमा झालेली रक्कम ऑनलाइन पद्धतीने वळती करून ती देशभरातील अन्य साथीदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी या खात्याचा वापर केल्याचा संशय आहे.

तांत्रिक तपासातून आरोपी जाळ्यात

तांत्रिक विश्लेषण आणि राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवरील माहितीच्या आधारे दक्षिण विभाग सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर नागपूरमधील जरीपटका परिसरात सापळा रचून कंपनीचा संचालक रितीक धारगावे याला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासात अनिरुद्ध उके आणि मुख्य सूत्रधार अमित काळे यांचा सहभाग उघड झाल्याने त्यांनाही अटक करण्यात आली.

मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त

आरोपींकडून विविध बँकांची ११ चेकबुक आणि पासबुक, वेगवेगळ्या कंपन्यांची २५ सिमकार्ड, बनावट कंपन्यांचे ११ रबर स्टॅम्प, तीन स्टॅम्प पॅड, डेबिट आणि एटीएम कार्ड, क्यूआर कोड, तसेच बनावट कंपन्यांची कागदपत्रे आणि पॅन कार्ड जप्त करण्यात आली आहेत.या कारवाईत तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, पोलीस निरीक्षक बागवान, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास गोपाळ, पोलीस शिपाई मंगेश गायकवाड आणि गोरख पाटेकर यांनी सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT