Mumbai Local Mega Block Pudhari
मुंबई

Mumbai Local Mega Block: खरेदीच्या उत्साहावर मेगाब्लॉकचे विरजण; तुडुंब लोकल, स्थानकांवर रखडपट्टी

मुख्य मार्गासह हार्बरवरही प्रवाशांचे हाल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: गणरायाच्या आगमनाला अवघा आठवडा उरल्याने खरेदीसाठी रविवार साधत मोठ्या संख्येने घराबाहेर पडलेले मुंबईकर मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे अक्षरशः हैराण झाले. सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात आला.

काही लोकल रद्द झाल्या, तर काही गाड्या जलद मार्गावर वळविण्यात आल्याने सेवा विलंबाने धावल्या. त्यामुळे उपलब्ध लोकलवर प्रवाशांचा ताण वाढला आणि स्थानकांवर मोठी गर्दी झाल्याने मोठी दमछाक पाहायला मिळाली.

दादर, लालबाग, मस्जिद बंदर आणि क्रॉफर्ड मार्केट परिसरात गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी आधीच झुंबड उडाली होती. या गर्दीत रेल्वेचा खोळंबा वाढल्याने खरेदीसाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांची चांगलीच कोंडी झाली.

एक लोकल गेल्यानंतर पुढच्या गाडीची प्रतीक्षा करावी लागत होती आणि ती आली तरी आत शिरणे कठीण जात होते. हातात खरेदीच्या पिशव्या, सोबत कुटुंबीय आणि त्यात गर्दीची लोकल, यामुळे प्रवाशांची दमछाक झाली. कधी ऊन तर कधी पाऊस आणि वाढलेला उकाडा यामुळे त्रासात आणखी भर पडली.

मेगाब्लॉकमुळे लोकलच्या मार्गात बदल झाल्याने प्रवाशांचा गोंधळही उडाला. काही स्थानकांवरील इंडिकेटरवर सीएसएमटी दाखविले जात असतानाही गाडी प्रत्यक्षात कुठपर्यंत जाणार, याबाबत स्पष्ट माहिती मिळत नव्हती. कुर्ला आणि दादरमध्ये याचा फटका अधिक जाणवला. लोकल आणि स्थानकांवरील अपुऱ्या उद्‌घोषणांमुळे प्रवाशांना पुढील प्रवासाचे नियोजन करणेही अवघड झाले.

हार्बर मार्गावर तर मेगाब्लॉकनंतरही गर्दीचा फटका कायम राहिला. सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रेदरम्यान ब्लॉक असल्याने वाशी, बेलापूर, पनवेल तसेच वांद्रे, गोरेगावकडे जाणाऱ्या अनेक लोकल फेऱ्या रद्द झाल्या.

त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गाचा आधार घ्यावा लागला. पनवेल-कुर्लादरम्यान विशेष लोकल सोडण्यात आल्या; मात्र खरेदीसाठी बाहेर पडलेल्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने या गाड्यांनाही गर्दीचा ताण सहन करावा लागला.

मेगाब्लॉकची वेळ संपल्यानंतरही हार्बरवरील सेवा लगेच पूर्वपदावर आली नाही. सायंकाळी ५.०३ वाजता सुटणारी पनवेल लोकल १५ मिनिटे उशिराने सुटली. गाडी येताच प्रवाशांनी मोठी गर्दी केली. पनवेलकडे जाणारी ही लोकल तुडुंब भरली होती. विशेष म्हणजे फर्स्ट क्लासचा डबाही अन्य प्रवाशांनी भरून गेला होता.

त्यामुळे मेगाब्लॉक संपल्यानंतरही प्रवाशांना दिलासा मिळाला नाही. मुख्य मार्गावर कल्याण, डोंबिवली, ठाणे, मुलुंड, विक्रोळी, कांजूरमार्ग, घाटकोपर, विद्याविहार, कुर्ला, सायन, माटुंगा, दादर आणि परळ या स्थानकांवरही गर्दीचा ताण होता.

धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविल्याने काही स्थानकांवरील थांबे टाळले गेले. त्यामुळे प्रवाशांना गाड्या बदलण्याची वेळ आली. गणरायाच्या खरेदीसाठी उत्साहाने घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचा रविवार अखेर लोकलच्या गर्दी, विलंब आणि खोळंब्यातच गेला अशा अनेक तक्रारी प्रवाशांनी केल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT