

मुंबई: महाराष्ट्रात एकीकडे डान्स बारला बंदी घालणारे आणि लाडक्या बहिणींचा सतत उदोउदो करणाऱ्या राज्यकर्त्यांकडून होणाऱ्या दहीहंडीसाख्या पवित्र धार्मिक उत्सवाच्या व्यासपीठावर नृत्यांगणांच्या अश्लील आणि उच्छृंखल नृत्य सादरीकरणावर समाजमाध्यमांवर टीकेची झोड उठली आहे.
दहीहंडीच्या व्यासपीठावर सादर झालेली अश्लील नृत्ये ही बार मध्ये सादर होणाऱ्या अश्लील नृत्यांनाही मागे टाकणारी आहेत, तर अशा वेळी महिला आयोग कुठे आहे, अशा तीव्र स्वरूपाच्या टीका समाजमाध्यमांवर होत आहेत.
राज्यात शनिवारी दहीहंडीच्या उत्सवात गोविंदा थर रचत असतांना त्यांच्या मनोरंजनासाठी मुंबई आणि ठाणे महानगरात काही राजकीय आयोजकांनी लावणी किंवा तत्सम नृत्यांगनांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
या नृत्यांगनांनी सादर केलेली नृत्ये ही अश्लीलतेचा कळस गाठणारी आणि किळस आणणारी होतीच, पण लोककला आणि लोकसंस्कृतीच्या अभिजातता आणि पावित्र्यावर घाला घालणारी होती.
या नृत्यांगणांच्या नृत्याचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर करून आयोजकांवर यथेच्छ टीका करण्यात आली. हिंदू सणांचे आणि धर्मांचे पावित्र्य टिकवण्यासाठी सतत धावा करणाऱ्या हिंदू संस्कृती जागतिक पातळीवर नेवून ठेवली आहे.
गोपाळकाल्याच्या पवित्र सणांच्या नावाखाली महिलांनी सादर केलेले नृत्यप्रदर्शन हे उत्तर प्रदेश - बिहारमध्ये होणाऱ्या मनोरंजनाच्या पातळीवरचे होते, त्यामुळे महाराष्ट्रातही बिहारची संस्कृती नांदू लागल्याचे हे द्योतक असल्याची टीका यानिमित्ताने होते आहे. एकीकडे
सरकारकडे रस्ते, पाणी वाहतूक व्यवस्थांच्या प्रकल्पांसाठी पैसा नाही, परंतू दहीहंडीवर करोडो रूपयांची उधळपट्टी करणाऱ्या आयोजकांकडे एवढा पैसा कुठून येतो, असाही सवाल यानिमित्ताने उपस्थितीत होतो आहे.
दहीहंडी उत्सवात अशा पध्दतीने लावणी सादर होणे चुकीचेच आहे. गेली ५- ६ वर्षे हे प्रकार लावणीचे अशा पध्दतीने सादरीकरण होत आहे. हे अंग प्रदर्शन आहे, ती कला नाही. पूर्वी सरकार सतत तमाशा, लावणी महोत्सवाचे आयोजन करत होते. त्यातून लावणी, तमाशा आणि लोककला कळायची.
- सुरेखा पुणेकर - ज्येष्ठ लावणी नृत्यांगना
लोककला ही अभिजात पध्दतीनेच सादर झाली पाहिजे. लोककला सादर करणे हे जरी मनोरंजनाचे असले तरी त्याचा आत्मा प्रबोधनाचा आहे. संयुक्त महाराष्ट्रापासून ते अनेक चळवळींमध्ये लोककलांचे महत्व अन्ययसाधारण आहे. लोककलांना सामाजिक भानाची झालर असणे आवश्यक आहे.
- भावार्थ देखणे - भारूडकरार
लोककलांच्या नावाखाली महिलांचे अश्लील नृत्य करणे, या उत्सवामध्ये गोविंदाचे होणारे मृत्यू, त्यांना होणारी दुखापत असे उत्सवातून आनंदाऐवजी दुःख निर्माण होणारे प्रकार घडत आहेत. धर्म आणि संस्कृतीनुसार या उत्सवाचे पावित्र्य, मांगल्य जपले गेले पाहिजे,
- सुनील घनवट - संघटक - हिंदू जनजागरण समिती