Mumbai Cruise Tourism Pudhari
मुंबई

Mumbai Cruise Tourism: मुंबई बनली भारताच्या क्रूझ पर्यटनाची राजधानी; सर्वाधिक प्रवासी मुंबईतून

देशातील क्रूझ प्रवासी वाहतुकीत १२ वर्षांत ७.५ पटीने वाढ

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: भारतातील सर्वात मोठे क्रूझ बंदर असलेल्या मुंबईत एका दशकात क्रूझ प्रवाशांच्या संख्येत सातपटीहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे देशातील वाढत्या क्रूझ पर्यटन उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून मुंबईची ओळख निर्माण झाली आहे.

मोठ्या बंदरांमधील क्रूझ पर्यटकांच्या आकडेवारीनुसार, २०१३-१४ मध्ये मुंबईत केवळ ३६ क्रूझ जहाजे आली होती आणि त्यातून ३२,०६० प्रवाशांची वाहतूक झाली होती. मात्र २०२५-२६ मध्ये ही संख्या वाढून ९५ क्रूझ जहाजे आणि सुमारे २.४ लाख प्रवाशांपर्यंत पोहोचली आहे.

क्रूझ पर्यटनाच्या वाढीचा फायदा केवळ बंदर क्षेत्रापुरता मर्यादित नसून शहरातील वाहतूक, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, खरेदी, पर्यटन मार्गदर्शक आणि सांस्कृतिक स्थळांनाही होत आहे.

मुंबईतील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल सुरू झाल्याने या क्षेत्राच्या विकासाला आणखी वेग मिळाला आहे. हे देशातील सर्वात मोठे क्रूझ टर्मिनल असून ते ४.१५ लाख चौ. फूट क्षेत्रात उभारले गेले आहे. या टर्मिनलची वार्षिक १० लाख प्रवाशांची हाताळणी करण्याची क्षमता आहे. तसेच एकाच वेळी १०,००० प्रवासी हाताळणी करण्याची सुविधा आहे.

२०२५-२६ मध्ये भारताच्या एकूण क्रूझ प्रवासी वाहतुकीपैकी जवळपास ४२% वाटा मुंबईचा होता. मुंबईने २.४ लाख प्रवाशांची हाताळणी केली असून ती इतर प्रमुख बंदरांपेक्षा आघाडीवर आहे. त्यानंतर मुरमुगाव, लक्षद्वीप, कोचीन आणि चेन्नई यांचा क्रमांक लागतो.

देशांतर्गत क्रूझ सेवांचा मुंबईच्या वाहतुकीत मोठा वाटा आहेच याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाजांमधून १३,५०० हून अधिक परदेशी पर्यटक मुंबईत आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT