26/11 Mumbai terror attack accused Tahawwur Rana
नवी दिल्ली : २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक असलेल्या तहव्वुर राणा याची मुंबई गुन्हे शाखेने दिल्लीत जाऊन चौकशी केली. बुधवारी, मुंबई गुन्हे शाखेचे एक पथक दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी तहव्वुर राणा याची ८ तासांहून अधिक चौकशी केली. तहव्वुर राणा उडवाउडवीची उत्तरे देत असून तो तपासात सहकार्यही करत नसल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. तहव्वुर राणाला दिल्लीतील एनआयए मुख्यालयातील कोठडीत ठेवण्यात आले आहे.
२६/११ च्या मुंबई हल्ल्यात १६६ लोकांचा बळी गेला होता आणि अनेक पोलिस अधिकारीही शहीद झाले होते.
राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. तहव्वुर राणाची दिल्लीतील राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मुख्यालयात चौकशी सुरू आहे. ६४ वर्षीय दहशतवादी राणाला १० एप्रिल रोजी न्यायालयाने १८ दिवसांच्या एनआयए कोठडीत सुनावली होती. तपास संस्था सध्या त्याची कसून चौकशी करत आहे.
दरम्यान, राणाची नातेवाईकांशी फोनवर बोलण्याची परवानगी देण्याची मागणी न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली होती. पतियाळा न्यायालयात राणाने त्यासाठी अर्ज केला होता. मात्र, एनआयएने त्याच्या मागणीला विरोध केला होता. न्यायालयाने या प्रकरणी बुधवारी आदेश राखून ठेवला. त्यानंतर गुरुवारी विशेष न्यायाधीश चंदरजीत सिंह यांनी आदेश देताना न्यायालयाने नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्यांशी बोलण्याची परवानगी नाकारली.
अधिक मिळालेल्या माहितीनुसार, एनआयए तहव्वुर राणाच्या फोन संभाषणाच्या रेकॉर्डची चौकशी करत आहे. या फोन संभाषणात दाऊदच्या सहभागाचे संकेत असू शकतात, असा संशय तपास अधिकाऱ्यांना आहे.
तहव्वुर राणा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आहे. त्याचा लष्कर-ए-तोयबा (एलईटी) चा दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीशी संबंध असल्याचे मानले जाते. हेडली हा अनेक दहशतवादी हल्ल्यातील सूत्रधार मानला जातो. मुंबई हल्ल्याच्या कटात सहभागी झाल्याप्रकरणी व लष्कर-ए-तोयबाला मदत केल्याप्रकरणी शिकागो न्यायालयाने त्याला २०११ मध्ये दोषी ठरवले होते.