

नवी दिल्ली : २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी ताब्यात घेतले. राणाचे प्रत्यार्पण करुन भारतात आणले त्यानंतर लगेच एनआयएने दिल्लीच्या पालम विमानतळावरूनच ताब्यात घेतले. त्याला दिल्लीच्या तिहार तुरुंगात विशेष सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. अमेरिकेतून राणाचे भारतात प्रत्यार्पण हा आपल्या देशासाठी मोठा विजय समजला जात आहे. राणावर एनआयएच्या विशेष न्यायालयात खटला चालणार आहे. यासाठी सरकारी वकील म्हणून नरेंद्र मान यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने नियुक्त केले आहे. तर पियूष सचदेवा राणाचे वकील आहेत. राणाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी देशभरातून केली जात आहे. नेमकी काय शिक्षा होणार याचा निर्णय आता न्यायालय घेईल.
दहशतवादी तहव्वूर राणाला गल्फस्ट्रीम जी ५५० विमानाने अमेरिकेतून भारतात आणण्यात आले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भारतीय अधिकारी दिल्लीच्या पालम विमानतळावर राणाला घेऊन उतरले. त्यानंतर लगेच त्याला एनआयएने ताब्यात घेतले. विमानतळावर राणाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर विशेष सुरक्षेत त्याला पटियाला हाऊस न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीश चंद्रजित सिंह यांच्यासमोर राणाला हजर करण्यात आले. न्यायालयाने राणाला एनआयएच्या कोठडीत दिले आहे. एनआयएचे पथकाने त्याची कसून चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
सरकारी वकिलांची नियक्ती करणाऱ्या परिपत्रकार गृह मंत्रालयाने म्हटले की, केंद्र सरकारद्वारे वकील नरेंद्र मान यांची दिल्ली येथील एनआयए विशेष न्यायालय आणि अपीलीय न्यायालयांसमोर एनआयएच्या वतीने एनआयए प्रकरणाशी संबंधित खटला आणि इतर बाबींसाठी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. ही अधिसूचना प्रकाशित झाल्याच्या तारखेपासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा सदर प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्यांची नियुक्ती असेल, असे मंत्रालयाने म्हटले.
तहव्वुर राणाचे प्रतिनिधीत्व वकील पीयूष सचदेवा करतील. दिल्ली राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरणाने वकील पियुष सचदेवा यांची राणाचा वकील म्हणून नियुक्ती केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पीयूष सचदेवा यांनी आपले फोटो प्रसारित करू नयेत अशी विनंती केली आहे.
राष्ट्रीय तपास संस्थेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले की, २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपी तहव्वुर हुसेन राणा याचे प्रत्यार्पण यशस्वीरित्या करण्यात आले आहे. सततच्या आणि एकत्रित प्रयत्नांनंतर हे प्रत्यार्पण झाले. एनआयएने संपूर्ण प्रत्यार्पण प्रक्रियेत इतर भारतीय गुप्तचर संस्था, एनएसजी सोबत काम केले. भारताचे परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाने अमेरिकेतील इतर संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून प्रत्यार्पण यशस्वीरित्या पूर्ण केले, असे एनआयएने म्हटले आहे.
तिहार तुरुंगात तहव्वूर राणाला कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासाठी त्रि-स्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. स्वॅट, दिल्ली पोलिस आणि सीआरपीएफचे विशेष पथक त्याच्या सुरक्षेसाठी तैनात केले जाईल. राणाच्या कक्षामध्ये केवळ १२ अधिकाऱ्यांनाच प्रवेश असेल, असेही समजते.