नवी दिल्ली : २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक असलेल्या तहव्वुर राणाची दिल्लीतील राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) मुख्यालयात चौकशी सुरू आहे. रविवारी त्याचा एनआयए कोठडीचा तिसरा दिवस होता. दरम्यान, एनआयए राणाचे डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधांची चौकशी करत आहे.
प्राप्त माहितीनुसार, एनआयए तहव्वुर राणाच्या फोन संभाषणाच्या रेकॉर्डची चौकशी करत आहे. या फोन संभाषणात दाऊदच्या सहभागाचे संकेत असू शकतात, असा संशय तपास अधिकाऱ्यांना आहे. एनआयएचा अंदाज आहे की २००५ पासून मुंबई हल्ल्यांचे नियोजन केले जात होते. राणा देखील त्या योजनेचा एक भाग होता. हेडलीच्या त्याच्याशी झालेल्या फोन संभाषणांचीही चौकशी केली जात आहे.
राणाचे लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा दावा एनआयए बऱ्याच काळापासून करत आहे. राणा पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या आयएसआयच्या संपर्कात होता का, याची चौकशी केली जात आहे. तपास सुलभ करण्यासाठी, राणाच्या आवाजाचा नमुना गोळा करण्यात येणार आहेत. एनआयएला राणाचा आवाज फोनवरील संभाषणाशी जुळवुन पाहायचा आहे.