मुंबई: मुंबई महापालिका मुख्यालयाजवळ वाहने उभी केल्यामुळे नगरसेवकांना वाहतूक पोलिसांनी नो पार्किंगचा दंड ठोठावला आहे. सुमारे 20 ते 21 वाहनांवर ही कारवाई करण्यात आल्याने नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर महापालिका सभागृहात चर्चा सुरू असल्यामुळे मुंबईतील 237 नगरसेवक दररोज मुख्यालयात येत आहेत. त्यांच्या वाहनांना पार्किंगसाठी जागा नसल्याने ते वाहने मुख्यालयाभोवती उभी करीत आहेत. काहीजण एक नंबर गेटच्या समोरील पुतळ्यापासून सेल्फी पॉइंटपर्यंत गाड्या उभ्या करीत आहेत. मात्र याचा वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
गुरुवारी वाहतूक पोलिसांनी या 20 ते 21 वाहनांना नो पार्किंगचा प्रत्येकी 2 हजार रुपये दंड ठोठावला आहे. त्यामुळे नगरसेवकांची चांगलीच पळापळ झाली. नगरसेवकांना वाहने उभी करण्यास पुरेशी पार्किंग नसल्याची तक्रार अनेकदा महापालिका सभागृहात करण्यात आली होती, पण महापालिका प्रशासनाने फारसे गांभीर्याने घेतले नाही.
सुरक्षारक्षक कुठे होते?
नगरसेवकांची वाहने कुठे पार्किंग करण्यात येतात, हे महापालिका सुरक्षारक्षकांना माहीत असते. मग वाहतूक पोलिसांकडून ज्यावेळी कारवाई होत होती. त्यावेळी सुरक्षारक्षक कुठे होते, असा सवाल, नगरसेवकांनी केला आहे. वाहतुकीला अडथळा होत होता, तर त्याची कल्पना त्यांनी पालिका सुरक्षा विभागाला देणे आवश्यक होते, असे मत सभागृह नेते गणेश खणकर यांनी व्यक्त केले.