नगरसेवकांच्या वाहन स्टिकरवर क्यूआर कोड  pudhari photo
मुंबई

BMC QR code vehicle sticker : नगरसेवकांच्या वाहन स्टिकरवर क्यूआर कोड

गैरवापर टाळण्यासाठी पालिकेने घेतला निर्णय

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : नगरसेवकांच्या वाहनांसाठी महापालिकेने क्यूआर कोड असलेले स्टिकर दिले आहेत. विशेष म्हणजे एका नगरसेवकाला एकच स्टिकर देण्यात येत असल्यामुळे गाडीवर स्टिकर लावून मुंबईत फिरणाऱ्या नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांना चाप बसणार असून स्टिकरचा गैरवापरही बंद होणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या सचिव विभागाकडून नगरसेवकांना त्यांच्या वाहनांवर पालिकेचा लोगो असलेला व नगरसेवक नाव असलेला स्टिकर दिला जातो. पूर्वी नगरसेवक मागेल तेवढे स्टिकर दिले जात होते. त्यामुळे अनेक गाड्यांवर नगरसेवक असलेले स्टिकर दिसून येत होते. विशेष म्हणजे गाडीत नगरसेवक नसतानाही अनेक कार्यकर्ते स्टिकर लावलेली गाडी घेऊन मुंबईत फिरताना दिसत होते.

या स्टिकरचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन, यावेळी स्टिकर वाटपावर बंधने आणली आहेत. गेल्या काही दिवसांपासून नवनियुक्त नगरसेवकांना त्यांच्या वाहनावर लावण्यासाठी स्टिकर वितरित करण्यात येत आहे. प्रत्येक नगरसेवकाला एकच स्टिकर दिला जात असून या स्टिकरवर क्यूआर कोड आहे. त्यामुळे हा क्यूआर कोड स्कॅन केल्यावर, नगरसेवकांनी दिलेल्या अधिकृत गाडीचा नंबर व नगरसेवकाचे नाव काय हे समजणार आहे.

नगरसेवकाने स्टिकर्स मिळण्यासाठी पत्र दिल्यानंतर क्यूआर कोड असलेला स्टिकर त्यांना दिला जात आहे. काही नगरसेवकांनी एकापेक्षा जास्त स्टिकरची मागणी केली. महापालिका मुख्यालयात येण्यासाठी आपण वेगवेगळ्या गाड्यांचा वापर करत असल्यामुळे एकापेक्षा जास्त स्टिकर हवे असल्याचे नगरसेवकांकडून सांगण्यात आले. मात्र महापालिकेकडून एकापेक्षा जास्त स्टिकर देण्यास नकार देण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT