मुंबईत बांधकामांच्या वेळेत कपात करा ! pudhari photo
मुंबई

Mumbai construction pollution : मुंबईत बांधकामांच्या वेळेत कपात करा !

वाढते प्रदूषण रोखण्यासाठी पालिका राज्य सरकारकडे पाठवणार ठराव

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई शहर व उपनगरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामांमुळे प्रदूषणातच नाही तर नागरिकांनाही त्रास सहन करावा लागत आहेत. त्यामुळे बांधकामांच्या वेळेत कपात करा, अशी मागणी आता भाजपाने केली आहे. याबाबत मुंबई महापालिका सभागृहात ठराव करून, तो राज्य सरकारच्या मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.

मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासह नवीन इमारतींचे बांधकाम सुरू असून ठिक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्याशिवाय अन्य बांधकामेही सुरू आहेत. या प्रकल्पांसाठी सध्याच्या ध्वनिप्रदूषण नियमानुसार पहाटे 6 ते रात्री 10 या वेळेत बांधकाम करण्याची परवानगी आहे. परंतु विकासक व कंत्राटदार अशा विहित वेळेनंतरही आपली कामे सुरूच ठेवतात. त्यामुळे शहराच्या प्रदूषणातच वाढ होत नाही तर आरोग्यविषयक समस्यांनाही नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत शेकडो तक्रारी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयासह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात येतात. परंतु विकासक व अधिकाऱ्यांमध्ये दडलेल्या अर्थकारणामुळे कारवाई होत नाही.

रात्री उशिरापर्यंत बांधकामांसाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्राचा आवाज, कामगारांचा गोंगाट, यामुळे रात्रीच्या वेळी शांततेचा भंग होऊन वयोवृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींची झोपमोड होते. यासाठी मुंबईतील पुनर्विकास व पायाभूत प्रकल्पांच्या बांधकामांच्या ध्वनिप्रदूषण नियमानुसार सध्याच्या वेळेत बदल करून बांधकामासाठी सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत परवानगी देण्यात यावी, अशी मागणी भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका माजी उपमहापौर अलका केरकर यांनी केली आहे.

पालिका सभागृहात ठराव

बांधकामांच्या वेळेत बदल करण्यासाठी मुंबई महापालिका सभागृहात ठरावाची सूचना सादर करण्यात आली आहे. या ठरावाच्या सूचनेवर महापालिका सभागृहात चर्चा करून, वेळेत बदल करण्याचा ठराव मंजूर करण्यात येणार आहे. हा ठराव मंजूर झाल्यानंतर तो महापालिका प्रशासनामार्फत राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे या ठरावावर राज्य सरकार काय निर्णय घेणार यावर मुंबईकरांचे आरोग्य अवलंबून आहे.

प्रदूषणात वाढ

चार दिवसांनंतर मुंबईचा सरासरी एक्यूआय शंभरीपार (102) गेला. कुलाब्यानंतर माझगाव (150), मालाड (146) आणि महालक्ष्मी (144) आणि विक्रोळी येथील कन्नमवार नगर 2 (124) आदी भागांमध्ये प्रदूषणाचा टक्का वाढत आहे. 15 ते 18 मार्च या कालावधीत मुंबईचा सरासरी एक्यूआय 73 ते 90 दरम्यान होता. त्यात आता 12 अंकांनी वाढ झाली.

मुंबईत सध्या सुरू असलेली बांधकामे

इमारत बांधकाम - 3,800

रस्ते - 240

सांडपाणी प्रक्रिया केंद्र - 7

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT