मुंबई : नरेश कदम
2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे जर काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आघाडी केली असती, तर आज ठाकरे बंधूंसह काँग्रेसची मुंबई महापालिकेत सत्ता आली असती. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह भाई जगताप अशा काँग्रेस नेत्यांचा स्वबळाचा हट्ट पक्षाला चांगलाच नडला, तसेच ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेच्या सत्तेचा वारू काँग्रेस नेत्यांच्या हट्टामुळे रोखला गेला, हे निवडणूक निकालावरून स्पष्ट होत आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीला चांगले यश आले होते. पण केवळ उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याशी युती करताच वर्षा गायकवाड,भाई जगताप या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यामुळे उत्तर भारतीयांची मते काँग्रेसला मिळणार नाहीत, अशी भीती काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली. तसेच प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मनातही ठसविले.
मुंबईत लोकसभेप्रमाणे आघाडी एकसंध राहिली पाहिजे, असे शरद पवार यांनी मुंबई काँग्रेसच्या नेत्यांना बोलावून समजावले. पण मुंबई काँग्रेसच्या नेत्यांचा निर्णय आधीच झाला होता. मुस्लिम आणि दलित मतांचे विभाजन भाजपच्या पथ्यावर पडेल, असा धोका मुंबई काँग्रेसच्या नेत्यांना सांगण्यात आला, पण भाई जगताप आणि वर्षा गायकवाड हे नेते स्वबळाची भाषा करत राहिले. उद्धव ठाकरे हे राहुल गांधी यांच्याशी बोलले. पण काही झाले नाही.
राहुल गांधी यांचा अदानीवरील टीकेचा मुद्दा राज ठाकरे यांनी प्रभावीपणे मांडला, पण मुंबई काँग्रेसचे नेते मूग गिळून बसले होते. याचे गुपित काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पडले आहे. स्वबळावर लढून 15 च्या आसपास काँग्रेस राहिला. 2017 मध्ये 31 नगरसेवक होते. मुस्लिम मतांचे उद्धव ठाकरे गट, सपा, एमआयएम,काँग्रेस यांच्यात विभाजन झाले. एमआयएमने काँग्रेसच्या काही जागा खेचल्या, ज्या उत्तर भारतीयांच्या मते मिळणार नाही असा बाऊ केला त्यांची मते काँग्रेसला मिळाली नाहीच. ही मते भाजपला पडली. एकसंध महाविकास आघाडी असती तर आघाडीची सत्ता मुंबईत आली असती. पण मुंबई काँग्रेसच्या नेत्यांचा करंटेपणा नडला आणि भाजपहाती सत्ता गेली.