Maharashtra Politics Pudhari
मुंबई

Maharashtra Politics: वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीबद्दल नाराजी; नेत्यांची पक्षश्रेष्ठींकडे तक्रार

मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी

पुढारी वृत्तसेवा

नरेश कदम

मुंबई: महापालिका निवडणुकीत ठाकरे गटासोबत आघाडी न करण्याचा मुंबई काँग्रेसचा निर्णय चुकीचा होता, ही मुंबई काँग्रेसच्या नेत्यांमधील खदखद अखेर बाहेर पडली आहे. काही नेत्यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीबद्दल थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटासोबत काँग्रेसने आघाडी केली असती तर महापालिकेत सत्ता आघाडीची आली असती, असे काँग्रेस तसेच ठाकरे गटाचे नेते उघडपणे बोलत आहेत. तसेच निवडणूक निकालावरूनही हे स्पष्ट दिसत आहे. ही खदखद निवडणूक झाल्यापासून त्यांच्या मनात होती.

मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गटासोबत आघाडी करणार नाही, अशी ताठर भूमिका सुरुवातीपासून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी घेतली. त्यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे काँग्रेस स्वबळावर लढेल, असा हट्ट धरला. त्यामुळेच ठाकरे गटासोबत आघाडी होऊ शकली नाही, असे मुंबई काँग्रेसमधील एका मुस्लिम नेत्याने सांगितले.

मुंबई काँग्रेसमधील गटबाजी ही जुनी आहे. पण तरीही ती पक्षासाठी अनुकूल राहिलेली आहे. पण मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरे गटासोबत आघाडी न करण्याचा पक्षाला महापालिकेत मोटा फटका बसला आहे.

दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे वर्षा गायकवाड यांच्या तक्रारी यापूर्वीही करण्यात आल्या होत्या. पण त्याची दखल घेण्यात आली नव्हती. आता थेट राहुल गांधी यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मुंबईतील काँग्रेसचे आजी-माजी आमदारांसह मुंबई काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी या तक्रारी केल्या आहेत.

मतविभाजनाचा फटका

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुस्लिम आणि दलित मते काँग्रेसप्रमाणे उद्धव ठाकरे गटालाही मिळाली होती. ठाकरे गट आणि काँग्रेस वेगळे लढल्यामुळे मुस्लिम आणि दलित मतांचे विभाजन झाले तसेच मुस्लिमबहुल भागात एमआयएम आणि सपाचे नगरसेवक निवडून आले. यामुळे काँग्रेसचे नुकसान झाले, तसेच अनेकांची तिकिटेही कापण्यात आली, असा तक्रारीचा पाढा मुंबई काँग्रेसच्या नाराज नेत्यांनी पक्षश्रेष्ठीकडे वाचला आहे.

मराठी नेत्याला अध्यक्ष करण्याच्या हालचाली

राहुल गांधी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले आहे. जर वर्षा गायकवाड यांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला तर काही नेत्यांची नावे चर्चेत आहेत. मराठी नेत्याला अध्यक्ष करण्याचाही प्रयत्न होऊ शकेल असे सांगण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT