Mumbai Coastal Road Phase 2 Pudhari
मुंबई

Mumbai Coastal Road Phase 2| मुंबई कोस्टल रोडचा दुसरा टप्पा दोन वर्षांत पूर्ण करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टप्पा पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी दूर होणार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली. मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी कोस्टल रोडच्या उत्तरेकडील टप्पा अत्यंत महत्त्चाचा आहे.

यातील वांद्रे ते वर्सोवा हा टप्पा मार्च २०२८, तर वर्सोवा ते भाईंदर हा उर्वरित टप्पा डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असून या आराखड्यानुसार वेगाने काम सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी 'मुंबई कोस्टल रोड प्रकल्प उत्तर'च्या लोखंडवाला रोटरी मिल्लतनगर नर्सरी (पॅकेज-अ), माइंड स्पेस इंटरचेंज, मालाड (पॅकेज-ब), मरिना एन्क्लेव्ह - चारकोप (पॅकेज- क आणि ड) आणि चारकोप सेक्टर-८ (पॅकेज-इ) येथील कामांची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला.

यावेळी मंत्री आशिष शेलार, आमदार अमित साटम, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या पाहणी दौऱ्यानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी कोस्टल रोडचा प्रकल्प अत्यंत महत्त्चाचा आहे. मुंबईतील ६० टक्के वाहतूक पश्चिम द्रुतगती मार्गावरून होते. कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यात वाहतूक सुरू आहे.

मेट्रोमुळे वाहतुकीवरचा भार थोडा कमी झाला असून येत्या काळातील मार्गिका सुरू झाल्यानंतर कोंडी आणखी कमी होणार आहे. मात्र, मुंबईची एकूण लांबी पाहता वाहतुकीसाठी एक समांतर आणि सिग्नलमुक्त मार्गाची आवश्यकता होती.

त्या अनुषंगाने कोस्टल रोडचे काम सुरू आहे. या कामाने वेग घेतला असून नियोजित आराखड्यानुसार काम सुरू आहे. मान्सूनच्या दोन-तीन महिने आणि त्यानंतरच्या कालावधीतील कामेही नियोजनानुसार वेळेत पूर्ण केली जातील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

पॅकेज अ मधील कामानुसार, मढ इंटरचेंजनंतर लोखंडवाला येथे प्रकल्पाचा दुसरा मोठा इंटरचेंज उभारण्यात येणार आहे. या परिसरात सध्या ४ प्रमुख रस्ते एकत्र येत असून, प्रस्तावित नॅशनल लॉ इन्स्टिट्यूटला कोस्टल रोडवरून थेट प्रवेश आणि निर्गमन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच, भगतसिंग नगर पुलाच्या कामाचेदेखील या इंटरचेंजमध्ये एकत्रीकरण करण्यात आले आहे.

येथे ग्राउंड लेव्हल, फर्स्ट लेव्हल आणि सेकंड लेव्हल (कोस्टल रोड लेव्हल) अशा ३ स्तरांची वाहतूक व्यवस्था विकसित करण्यात येणार असून, तिची रचना वरळी येथील प्रसिद्ध इंटरचेंजच्या धर्तीवर आधुनिक पद्धतीने करण्यात येईल. संपूर्ण परिसर सिग्नलमुक्त करण्याचा प्रयत्न असून, भविष्यात मोतीलाल नगर, वाघुरानगर आणि आसपासच्या पुनर्विकास क्षेत्रांमधून येणाऱ्या वाहतुकीचा ताण लिंक रोडवर कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

पॅकेज- ब प्रकल्पाची वैशिष्ट्ये :

माइंडस्पेस परिसरात प्रकल्पातील सर्वात मोठ्या इंटरचेंजपैकी एक विकसित करण्यात येत असून, येथे एकूण ९ रॅम्प्सची व्यवस्था असणार आहे. या इंटरचेंजद्वारे विविध दिशांतील वाहतुकीचे प्रभावी वितरण होणार होणार असून पूर्व उपनगरांकडे जाणाऱ्या वाहनांसाठी गोरेगाव-मुलुंड लिंक रोड कनेक्टरशी थेट जोडणी उपलब्ध होणार आहे.

यामुळे जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, स्टेशन रोड आणि सावरकर पूल परिसरातील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. सुमारे ४.५ किलोमीटर लांबीच्या या जोडमार्गामुळे माइंडस्पेस परिसरातील कार्यालये, आयटी पार्क, कॉल सेंटर्स आणि अन्य व्यावसायिक इमारतींना मोठा फायदा होणार असून येथेही सिग्नलमुक्त जंक्शन विकसित करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT