Mumbai local file photo
मुंबई

Mumbai Local: परराज्यातील प्रवाशांचे लाड, मुंबईकरांवर अन्याय!सीएसएमटी येथून रात्री ८ ते ८.४५ दरम्यान एकही फास्ट लोकल नाही

सीएसएमटीहून रात्रीच्या प्रवासाचे हाल; नोकरदारांना फास्ट लोकलची प्रतीक्षा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मध्य रेल्वे मार्गावर रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या पदरी सध्या तीव्र निराशा पडत आहे. सीएसएमटी येथून रात्री ८ वाजल्यानंतर एकही फास्ट लोकल उपलब्ध नसल्यामुळे नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाला दररोज रक्त आटवून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांपेक्षा परराज्यातील प्रवाशांसाठी गाड्या चालवण्यात जास्त रस आहे. आमच्या हक्काच्या गाड्या बंद करून मुंबईकरांना वाऱ्यावर सोडले जात आहे, असा संतप्त सवाल उपनगरीय प्रवासी संघटनेने उपस्थित केला आहे.

कसारा, कल्याण येथून मुंबईत नोकरी-धंद्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना कामावरून रात्री घरी परतताना मध्य रेल्वेचा जलद प्रवास आता दिवास्वप्न ठरू लागला आहे. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी रात्री ८.३० वाजता सीएसएमटी येथून ठाण्यासाठी सुटणारी फास्ट लोकल रेल्वे प्रशासनाने बंद केली आहे.

सध्या रात्री ८ नंतर सीएसएमटीवरून फक्त ८.४१ वाजता खोपोली फास्ट लोकल धावते. याशिवाय, सीएसएमटीऐवजी दादर येथून रात्री ८.४५ वाजता ठाण्यासाठी एक फास्ट लोकल सोडली जाते.

या अवघ्या दोन गाड्या सोडल्या तर रात्रीच्या वेळी ठाणे, कल्याण, कर्जत आणि कसाराकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी एकही जलद लोकल उपलब्ध नाही. यामुळे हजारो प्रवाशांना धीम्या गाड्यांनी ताटकळत प्रवास करावा लागत आहे.

उपनगर प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी रेल्वे प्रशासनाच्या या धोरणावर अत्यंत तीव्र शब्दांत आक्षेप घेतला आहे. "गेल्या १२ वर्षांपासून आम्ही कसारा मार्गावरील प्रवाशांसाठी अतिरिक्त फास्ट लोकल गाड्यांची मागणी करत आहोत.

मात्र, प्रत्येक वेळी 'स्लॉट उपलब्ध नाही' असे तांत्रिक कारण सांगून आमची मागणी फेटाळली जाते. मग आता मुंबई - बेंगळुरू वंदे भारत गाडीला जागा कशी मिळाली?" असा संतप्त सवाल त्यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला केला आहे. कसारा, कल्याण येथील लोकप्रतिनिधींनी यासाठी आवाज उठवावा," असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान, सीएसएमटीवरून रात्रीच्या वेळी हक्काच्या फास्ट लोकल फेऱ्या तातडीने सुरू न झाल्यास, रेल्वे प्रवाशांचा असंतोष येत्या काळात उफाळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT