

मुंबई: बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ना. म. जोशी मार्ग-लोअर परळ येथील प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पूर्ण झालेल्या ३ पुनर्वसन इमारतींतील एकूण ५५७ पात्र रहिवाशांना प्रातिनिधिक स्वरुपात सदनिकांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉईंट येथे ६ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता करण्यात येणार आहे.
पुनर्वसन इमारतींच्या ३ विंगमधील ५५७ सदनिकांच्या वितरण कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत.
३ मजल्यांच्या ३२ चाळींमध्ये १६० चौरस फूट सदनिकेत २५६० रहिवासी वास्तव्यास होते. दोन ते तीन पिढ्यांपासून १६० चौरस फुटांच्या खोलीत राहणाऱ्या पात्र रहिवाशांना म्हाडामार्फत ५०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची २ बीएचके सदनिका मालकीने दिली जाणार आहे.