

मुंबई: महाराष्ट्र पोलीस दलात राज्य सरकारने मोठे प्रशासकीय फेरबदल केले आहेत. भारतीय पोलीस सेवा (भापोसे) आणि राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या व नवीन पदस्थापनांचे आदेश गृह विभागाने २ नोव्हेंबर रोजी जारी केले.
या आदेशानुसार ठाणे, पुणे, सातारा, नांदेड, नागपूर, रत्नागिरी, लातूर आणि नाशिकसह विविध ठिकाणी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या विद्यमान पदावर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.
या फेरबदलात मिना मखवाना यांची ठाणे शहर पोलीस दलातील परिमंडळ-१ च्या पोलीस उपआयुक्त पदावरून ठाणे ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. वैशाली ईश्वर कडुकर यांची सातारा येथील अपर पोलीस अधीक्षक पदावरून पुणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. चेतना तिडके यांची अंबेजोगाई येथून नागपूरच्या अमली पदार्थविरोधी पथकात पोलीस अधीक्षक (अभियान) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
जयंत बजबळे यांची ठाणे येथील नागरी हक्क संरक्षण विभागातून ठाणे शहर पोलीस उपआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. सुरज गुरव यांची नांदेड येथील अपर पोलीस अधीक्षक पदावरून सातारा येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
नरसिंग यादव यांच्याकडे ठाणे येथील नागरी हक्क संरक्षण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संकेत सतीश गोसावी यांची पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागातून रत्नागिरी उपविभागीय पोलीस अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.
कुमार भीकाजी चौधरी यांची लातूरच्या औसा येथून महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथे पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष वैरागडे यांची दहशतवादविरोधी पथकातून नाशिकच्या मालेगाव कॅम्प उपविभागात बदली करण्यात आली आहे.
दरम्यान, अनमोल मित्तल यांची ठाणे ग्रामीण येथून अंबेजोगाई, बीड येथे अपर पोलीस अधीक्षकपदी, तर अरांक्षा यादव यांची रत्नागिरी उपविभागातून औसा, लातूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.
संदीप जाधव यांची प्रतीक्षाधीन अवस्थेतून नांदेडच्या अपर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुधीर पुंडलीक नंदनवार यांच्याकडे भंडारा जिल्ह्यातील तुमसर उपविभागीय पोलीस अधिकारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शिवराज पाटील, अमरसिंग जाधव आणि प्रशांत कदम या तीन अधिकाऱ्यांना त्यांच्या विद्यमान पदांवर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे.