BMC  pudhari photo
मुंबई

BMC Tender Controversy: स्थायी समितीला डावलून २.०७ कोटींचा खर्च; जल अभियंता विभागावर गंभीर आरोप

सदस्यांमध्ये नाराजी, चौकशी करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: परस्पर खर्चाला स्थायी समितीचा विरोध असतानाही जल अभियंता खात्याने वेगवेगळ्या कामांसाठी विना निविदा व स्थायी समितीची पूर्वपरवानगी न घेता, विविध कामांसाठी २ कोटी ७ लाख खर्च केला आहे. केवळ हा खर्चाचा प्रस्ताव स्थायी समितीच्या माहितीसाठी सादर करण्यात आला. त्यामुळे समिती सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या विविध खात्यामध्ये सध्या महापालिका अधिनियम १८८८ च्या कलम ६९ व कलम ७२ अन्वये परस्पर ५ ते ७५ लाख रुपये खर्च करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. त्यामुळे स्थायी समितीने अनेकदा तीव्र नाराजी व्यक्त केली.

परंतु महापालिका प्रशासनाला फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे प्रत्येक कामासाठी ५ ते ७५ लाखापर्यंत खर्च केला जात आहे. परंतु हे करत असतानाही कामे वेगवेगळी असल्याचे दाखवून हा खर्च करोडो रुपयांच्या घरात जात आहे.

महापालिकेच्या जल अभियंता विभागाने याच अधिकाराचा वापर करत, वेगवेगळी तेरा कामे केली आहेत. या कामांसाठी प्रत्येकी ५ ते ३८ लाखापर्यंत खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे एकूण कामाचा खर्च २ कोटी ७ लाख ५३ हजार ९६९ रुपयावर पोहचला आहे.

अर्थकारण दडल्याचा आरोप

वास्तविक एवढ्या मोठ्या रकमेच्या कामांची अधिकृतरित्या निविदा प्रक्रिया राबवणे आवश्यक होते. या प्रक्रियेनंतर या कामांचा प्रस्ताव स्थायी समितीत आणणेही बंधनकारक होते.

परंतु वेगवेगळी कामे दाखवून जल अभियंता विभागाने स्थायी समितीलाच बाजूला ठेवले. त्यामुळे समिती सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

अशाप्रकारे परस्पर विकास कामांसाठी खर्च करणे म्हणजे यात कुठेतरी अर्थकारण दडलेले असल्याचे दिसून येते, असा आरोपही समिती सदस्यांनी केला आहे.

त्यामुळे परस्पर करोडो रुपयांची कामे करणाऱ्या जल अभियंता विभागातील अभियंते अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT