BMC Budget Pudhari
मुंबई

Mumbai BMC Commissioner: मुंबई महापालिकेचा नवा आयुक्त कोण? चर्चांना उधाण

भूषण गगराणी 31 मार्चला निवृत्त; अर्धा डझन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे चर्चेत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त भूषण गगराणी 31 मार्चला सेवानिवृत्त होत असल्यामुळे महापालिकेचे नवीन आयुक्त कोण, याची उत्सुकता कर्मचारी व अधिकाऱ्यांना लागली आहे. आयुक्तपदाच्या स्पर्धेत अर्धा डझन वरिष्ठ सनदी अधिकारी असल्यामुळे राज्य सरकार यातील कोणाची वर्णी लावणार, हे येत्या आठ दिवसांत स्पष्ट होणार आहे.

मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाचा कारभार सांभाळणाऱ्या महापालिकेचे आयुक्त पद हे जवळपास राज्याच्या मुख्य सचिवाच्या दर्जाचे मानले जाते. त्यामुळे वरिष्ठ सनदी अधिकारी महापालिका आयुक्त यांच्या खुर्चीवर बसण्यासाठी उत्सुक असतात. पण या खुर्चीवर कोणाला बसवावे हे सर्वस्वी राज्य सरकारवर अवलंबून असते. विद्यमान आयुक्त भूषण गगराणी 31 मार्चला सेवानिवृत्त होणार असले तरी, 31 मार्चला महावीर जयंतीची असलेली सार्वजनिक सुट्टी लक्षात घेतात 30 मार्च रोजी गगराणी यांचा महापालिकेतील शेवटचा दिवस राहणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला येत्या आठ दिवसात म्हणजेच येणाऱ्या सोमवारपर्यंत नवीन पालिका आयुक्त यांच्याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे.

महापालिका आयुक्त पदासाठी संजय मुखर्जी, असीम गुप्ता, व्ही. राधा, अश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, मनीषा म्हैसकर- पाटणकर या वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची यांची नावे चर्चेत आहेत.

यात संजय मुखर्जी व संजीव जयस्वाल यांची नावे आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. परंतु महापालिका आयुक्तपदी कोणाला बसवावे, याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचे समजते. आयुक्त पदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही मत जाणून घेणार असल्याचे समजते.

महिला सनदी अधिकाऱ्यांना संधी!

मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात कधीही महिला सनदी अधिकारी पालिका आयुक्तांच्या खुर्चीवर बसलेली नाही. मात्र यावेळी अनेक सनदी महिला अधिकारी या महापालिका आयुक्त पदाच्या खुर्चीवर बसण्यासाठी सक्षम आहेत. विशेष म्हणजे मनीषा म्हैसकर, व्ही. राधा, अश्विनी भिडे यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये काम केले असून त्यांना पालिकेच्या कामकाजाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे यातील एका महिलेला पालिका आयुक्त पदी विराजमान होण्याची संधी असल्याचे बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT