

मुंबई : पाणीपट्टीत वाढ करण्यासंदर्भात अद्यापपर्यंत कोणताही विचार महापालिका प्रशासनाचा नाही, असे प्रशासनातर्फे मंगळवारी महापालिका सभागृहात स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पाणी महागणार, या चिंतेत असलेल्या मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.
पाणीपट्टीत वाढ होणार का, आणि झाल्यास त्याचा नेमका परिणाम काय होणार, याबाबत प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी केली. पाणीपट्टीत वाढ न करता राज्य सरकारकडे असलेली सुमारे 10 हजार कोटींची थकबाकी वसूल करण्यावर प्रशासनाने भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले. काँग्रेसचे गटनेते अश्रफ आजमी यांनीही पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटींकडे लक्ष वेधले.
2023-24, 2024-25 आणि 2025-26 या वर्षांत पाणीपट्टीत वाढ झालेली नाही. त्यामुळे पाणीपट्टीत वाढ होणार अशी कोणी दिशाभूल करू नका, असे मत सभागृह नेते गणेश खणकर यांनी व्यक्त केले. स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनीही पाणीपट्टीत वाढ होणार नसल्याचे सांगितले. यानंतर अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनीही पाणीपट्टी वाढीचा सध्या तरी कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले.
शहरात दररोज सुमारे 4 हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असताना त्यापैकी सुमारे 1 हजार दशलक्ष लिटर पाणी गळतीमुळे वाया जात आहे. झोपडपट्टी भागात पाण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो, तर अनेक उंच इमारतींमधील नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागते,असेही अश्रफ आजमी यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.