Bribery case pudhari photo
मुंबई

BMC bribery case : बिलमंजुरीसाठी ३.५० लाखांची लाच

महापालिकेच्या दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पिंक आर्मी योजना तसेच सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेच्या कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी ३ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या एम-पूर्व विभागातील दोन अभियंत्यांसह एका खासगी व्यक्तीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे.

सहायक अभियंता गणेश हनमंतराव चांदोलकर, उपअभियंता अविनाश दत्तात्रय दुधभाते आणि खासगी व्यक्ती विनीत खाडे अशी आरोपींची नावे आहेत. तिघांना अटक करण्यात आलेली नसून त्यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (बीएनएसएस) कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्यात आली आहे.

एसीबीच्या माहितीनुसार, ३४ वर्षीय तक्रारदाराने गोवंडी येथील एम-पूर्व विभागाच्या कार्यक्षेत्रात पिंक आर्मी योजनेअंतर्गत तसेच सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेचे काम केले होते. या कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी लोकसेवक क्र. १ व २ यांनी तक्रारदाराकडे ३ लाख ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने ५ मे २०२६ रोजी मुंबई एसीबीकडे लेखी तक्रार दिली. त्यानंतर एसीबीने तक्रारीची पडताळणी केली.

दरम्यान, या प्रकरणात सापळा कारवाई झालेली नाही. एसीबीने ३० सप्टेंबर रोजी दुपारी १२.२५ वा. गुन्हा नोंदवला. आरोपींना बीएनएसएस कलम ३५(३) अन्वये नोटीस देण्याची कारवाई सुरू आहे. आरोपींची अंगझडती, वाहन व कार्यालयाची झडती, मोबाईल जप्ती तसेच घरझडतीची कारवाई सुरू असल्याचे एसीबीने सांगितले. या कारवाईतून प्रकरणाशी संबंधित काही बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

या कारवाईवर सहायक पोलीस आयुक्त प्रविण पावले यांचे पर्यवेक्षण असून, पोलीस निरीक्षक रजनी उंबरकर या पडताळणी अधिकारी आहेत. अपर पोलिस आयुक्त संदीप दिवाण, अपर पोलिस उपायुक्त अनिल घेरडीकर आणि अनंत साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

पडताळणीत २ लाखांची मागणी

६ मे २०२६ रोजी झालेल्या पडताळणीदरम्यान सहायक अभियंता गणेश चांदोलकर यांनी तक्रारदाराकडे २ लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे उपअभियंता अविनाश दुधभाते आणि खासगी इसम विनीत खाडे यांनीही तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे पडताळणीत समोर आले. खासगी व्यक्ती विनीत खाडे याने लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचेही एसीबीच्या अहवालात नमूद आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT