BMC  pudhari photo
मुंबई

Mumbai BMC bribery case : पालिकेचे दोन अधिकारी-कर्मचारी लाच घेताना पकडले

के/पश्चिम कार्यालयातील प्रकार : बेकरी व्यवसायावर कारवाई न करण्यासाठी मागितले ७० हजार

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : बेकरीचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी तसेच व्यवसायावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या के/पश्चिम विभागातील अभियंतासह कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली. यातील कामगार विजय रमेश पाटील याला ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले, तर दुय्यम अभियंता निरवकुमार चुणीलाल जैसूर याला कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले.

एसीबीच्या माहितीनुसार, तक्रारदाराचा बेकरीचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय सुरू ठेवायचा असल्यास तसेच व्यवसायावर कोणतीही कारवाई होऊ नये, यासाठी महापालिका कामगार विजय पाटील याने स्वतःसाठी आणि दुय्यम अभियंता निरवकुमार जैसूर यांच्यासाठी ७० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने २ सप्टेंबर रोजी एसीबीच्या मुंबई विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर एसीबीने तक्रारीची पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान विजय पाटील याने ७० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्याने तक्रारदाराची त्याचा वरिष्ठ अधिकारी असलेल्या दुय्यम अभियंता निरवकुमार जैसूर यांच्याशी भेट घालून दिली.

या भेटीनंतर तडजोडीअंती जैसूर यांनी ६० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे एसीबीच्या पडताळणीत निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीने बुधवारी सापळा रचला. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे एसीबीने सांगितले. दोघांकडे सापडलेल्या रोख रकमेबाबत चौकशी केली जाणार आहे.

सापळा अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक अनिल चित्तरवाड यांनी कारवाई केली. पर्यवेक्षक अधिकारी म्हणून सहायक पोलिस आयुक्त गंगाप्रसाद मुदिराज यांनी काम पाहिले. अपर पोलिस आयुक्त संदीप दिवाण, अपर पोलिस उपआयुक्त अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

आरोपींच्‍या झडतीमध्ये मोबाईल, रोख रक्कम जप्त

  • के/पश्चिम वॉर्ड कार्यालयाच्या तळमजल्यावर लिफ्टजवळ तक्रारदाराकडून ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना विजय पाटील याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

  • त्याचवेळी दुय्यम अभियंता निरवकुमार जैसूर याला त्याच्या सहाव्या मजल्यावरील कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले. कारवाईनंतर दोन्ही आरोपींची झडती घेण्यात आली.

  • निरवकुमार जैसूर यांच्याकडून दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. तर विजय पाटील याच्याकडील झडतीत एक मोबाईल, ४० हजार ८२० रुपये रोख तसेच त्याच्या बॅगेतून २ लाख ३७ हजार ६०० रुपये रोख आढळून आले. हे पैसे कोणत्या कारणासाठी ठेवण्यात आले होते, याचाही तपास केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT