

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियनच्या मुंबईत २०२० मध्ये घडलेल्या बहुचर्चित मृत्यू प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (दि. २) दिले. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी आपल्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूच्या निष्पक्ष चौकशीच्या मागणीसाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्या. सारंग कोतवाल व न्या. रणजितसिंह राजा भोसले यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
सीबीआयने याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा (एफआयआर) दाखल करावा, सतीश सालियन यांचा सविस्तर जबाब नोंदवून घ्यावा आणि सीबीआयने या तपासाची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवावी, असे निर्देश यावेळी न्यायालयाने दिले.
तोपर्यंत आरोपी म्हणून वागवले जाणार नाही
तपासादरम्यान ठोस व पुरेसे पुरावे गोळा होईपर्यंत कुणालाही या प्रकरणात आरोपी म्हणून वागवले जाणार नाही. तपासाअंती गुन्हा घडल्याचे निष्पन्न न झाल्यास सीबीआयने संबंधित न्यायालयात योग्य तो ‘समरी रिपोर्ट’ सादर करावा, असे निर्देश देताना खंडपीठाने या अहवालावर आक्षेप नोंदवण्याचे स्वातंत्र्य सतीश सालियन यांना असेल, असेही नमूद केले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाशी संबंधित सर्व मूळ कागदपत्रे व फाईल्स सीबीआयकडे तत्काळ सोपवाव्यात, असा आदेशही न्यायालयाने दिला.
आत्महत्येचा निष्कर्ष
प्रसिद्ध सेलिब्रिटी मॅनेजर असलेल्या २८ वर्षीय दिशा सालियनचा ८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड येथील निवासी इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद करतानाच प्राथमिक चौकशीनंतर तिने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढला होता.
सुशांतसिंह राजपूतचीही आत्महत्या
दिशाच्या मृत्यूनंतर अवघ्या सहा दिवसांनी, १४ जून २०२० रोजी अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केली होती. सुशांतच्या मृत्यूची चौकशीही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयकडे सोपवली गेली होती. सीबीआयने या प्रकरणात आधीच क्लोजर रिपोर्ट सादर करीत सुशांतने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. या अहवालावर न्यायालयात अंतिम निर्णय प्रलंबित आहे.
याचिका राजकीय हेतूने असल्याचा दावा
आ. आदित्य ठाकरे यांनी न्यायालयात मध्यस्थी अर्ज दाखल करून कारवाईपूर्वी बाजू ऐकून घेण्याची विनंती केली होती. सालियन यांची याचिका खोटी, आधारहीन व राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा ठाकरे यांनी केला होता. मात्र, उच्च न्यायालयाने हे प्रकरण सखोल चौकशीसाठी सीबीआयकडे वर्ग केल्याने या प्रकरणाला पुन्हा वेगळे वळण मिळाले आहे.
प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्यासाठी दबाव : दिशाचे वडील
दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सतीश सालियन यांच्यातर्फे ॲड. नीलेश ओझा यांनी युक्तिवाद केला. आपल्या मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केली आणि काही प्रभावशाली व्यक्तींना वाचवण्यासाठी राजकीय दबावातून हे प्रकरण दाबले गेले, असा आरोप सालियन यांनी केला होता.