आठवडाभरात अंतिम प्रभाग रचना (Pudhari File Photo)
मुंबई

BMC election 2025 : आठवडाभरात अंतिम प्रभाग रचना

6 ऑक्टोबर रोजी अधिसूचना, आरक्षण सोडतीचीही प्रशासनाची तयारी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या प्रारुप प्रभाग रचनेवरील हरकती, सूचनांवरील सुनावणी पूर्ण करीत राज्य निवडणूक आयोगाने मुंबईची प्रभाग रचना अंतिम केली आहे. ही अंतिम प्रभाग रचना 6 ऑक्टोबरला अधिसूचनेद्वारा प्रसिद्ध केली जाणार आहे. यानंतर आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

निवडणुकीच्या प्रशासकीय कामकाजाने वेग घतला आहे. राज्य शासनाच्यावतीने मुंबईकरांच्या रखडलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यावर भर दिला जात असून विरोधकांकडून आरोपांच्या फैरी सुरू आहेत. त्यामुळे मुंबईचे राजकीय वातावरणही तापू लागले आहे.

डिसेंबर अखेर निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून निवडणुका घ्या, असे मा. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभागरचना तयार करून त्यावर 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या. आलेल्या हरकती व सूचनांवर 10 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर असे तीन दिवस यशवंतराव चव्हाण केंद्रात शासनाने नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकार्‍यांसमोर तक्रार मांडल्या. सुनावणीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी 189 सूचना आणि हरकती, 11 सप्टेंबर रोजी 277 हरकती आणि सूचना तसेच शुक्रवारी 28 सूचना व हरकतींवर सुनावणी झाली.

एकूण 494 हरकती व सूचनांवरील सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या हरकतींचा विचार करून राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचना अंतिम करून 6 ऑक्टोबरला जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर लगेचच आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. त्यामुळे 6 ऑक्टोबरनंतर निवडणुकीचे रणांगण आणखी तापणार आहे.

1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी ग्राह्य?

मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी वेगाने सुरू झाली असून जानेवारीपर्यंत निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे. निवडणुकीसाठी 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. मुंबई महापालिकेकडून सर्व पातळ्यांवर नियोजन करण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी 70 हजार कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे. तर निवडणुक कामासाठी साडेतीन हजार कर्मचारी तैनात केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT