

मुंबई : मुंबई महानगरपालिकेसह ठाणे नवी मुंबई व अन्य महानगरपालिकेच्या निवडणुका होणार असल्यामुळे यंदा मुंबई महानगरपालिकेकडून आपल्या कामगारांना खुश करण्यात येणार आहे. यावेळी बोनसची रक्कम 500 ते 1 हजार रुपयाने वाढवली जाण्याची शक्यता आहे. मात्र कामगार संघटनेने तब्बल 20 टक्के म्हणजेच प्रत्येक कर्मचार्याला सरासरी 66 हजार रुपये बोनस देण्याची मागणी केली आहे.
मुंबई महानगरपालिकेतील सुमारे 1 लाख कर्मचार्यांसह अनुदानप्राप्त खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षणसेवक, माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित-विनाअनुदानित), माध्यमिक शाळेतील शिक्षण सेवक (अनुदानित व विनाअनुदानित), अध्यापक विद्यालय अधिव्याख्याते शिक्षकेतर कर्मचारी (अनुदानित व विनाअनुदानित), अध्यापक विद्यालय शिक्षण सेवक (पूर्ण वेळ) (अनुदानित व विनाअनुदानित) व बेस्टमधील कर्मचार्यांना यंदा दिवाळीपूर्वी बोनस देण्यासाठी पालिका प्रशासनाची तयारी सुरू आहे.
पालिका कर्मचार्यांना 20 टक्के बोनस मिळावा अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनचे अध्यक्ष रमाकांत बने यांनी केली आहे. परंतु 66 हजार एवढा मोठा बोनस देण्यास महापालिका प्रशासन तयार होणार नाही. परंतु गेल्या वर्षीपेक्षा यंदा बोनसची रक्कम वाढवली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्यावर्षी दिवाळीला महापालिका कर्मचार्यांसह अन्य कर्मचार्यांना 29 हजार रुपये बोनस मिळाला होता. यंदा यात 500 ते 1 हजार रुपयापर्यंत वाढ करण्याची तयारी महापालिका प्रशासनाने ठेवली असल्याचे समजते. परंतु मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेता, बोनसबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वाटाघाटी करून प्रश्न सोडवला जाणार असल्याचे समजते.
नवरात्रोत्सवानंतर वाटाघाटी
बोनस संदर्भात कामगार संघटना व प्रशासनाची नवरात्र उत्सवनंतर वाटाघाटी होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होऊन बोनस बाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान कामगार संघटना 20 टक्के बोनसवर आजही आग्रही आहेत.