

BMC Election eknath Shinde Shiv Sena :
सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जानेवारी २०२६ पर्यंत घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे दोन्ही गट चांगलेच अॅक्टिव्ह झाले आहेत.
दरम्यान, शिंदे गटानं मुंबई महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व शिवसेनेच्या जागांवर दावा सांगितला आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं ९३ जागा जिंकल्या होत्या. त्यावर एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेनं दावा ठोकला आहे.
एवढंच नाही तर ९३ जागांसोबतच एकनाथ शिंदे यांनी अजूनही काही निवडून येणाऱ्या जागांवर देखील दावा ठोकला आहे. शिंदे गटाला मुंबई महापालिका निवडणुकीत एकूण १०० पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. मुंबई महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या ८३ जागा निवडून आल्या होत्या. त्याचबरोबर ६ मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. ३ अपक्ष नगरसेवक देखील शिवसेनेसोबत आले होते. अशा या सर्व ९३ जागांवर शिंदे गटानं दावा केला आहे.
काही दिवसातच मुंबई महापालिका निवडणुकीचं बुगूल वाजण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे युतीच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे अनेक सार्वजनिक आणि कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र आले होते. याचबरोबर मध्यंतरी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या देखील बैठका घेतल्या होत्या.
शिवसेनेनं आगामी दसरा मेळाव्याचं आमंत्रण राज ठाकरे यांना दिलं आहे. त्यामुळं याचवेळी मनसे आणि शिवसेना निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. पडद्यामागं अनेक राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. जर शिवसेना मनसे एकत्र आले तर काँग्रेस पक्ष वेगळा लढण्याची शक्यता देखील जाणकार व्यक्त करत आहेत.
मनसेला महाविकास आघाडीत सामावून घ्यायचं का याबाबत देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये खल सुरू आहे. आगामी काही दिवसात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यातील राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.