Mumbai Civic Issues
मुंबई : पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईची तुुंंबई ही रखडलेल्या मान्सूनपूर्व कामांमुळे झाल्याचे स्पष्ट झाल्याने महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी याची गंभीर दखल घेतली आहे. महापालिका मुख्यालयात बुधवारी बैठक घेत मान्सूनपूर्व रखडलेली कामे वेळेत पूर्ण करा, यापुढे मुंबईकरांचे हाल खपवून घेणार नाही, अशा कडक शब्दात पालिका अधिकार्यांची कानउघाडणी केली.
मुंबई का तुंबली याची सहा कारणे दै. पुढारीने मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध केली होती. त्यावर सविस्तर चर्चा करून त्यानुसार कामे पूर्ण करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
पंधरा दिवस आधीच मान्सूनचे मुंबईत आगमन झाले. परिणामी नाले सफाई, रस्ते व इतर कामांवर देखील काहीसा परिणाम झाला, ही वस्तुस्थिती आहे. अनेक नाल्यांतील गाळ काढण्याची कामे अपूर्ण राहिली. रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाची कामेसुध्दा अपूर्ण अवस्थेत होती. तसेच सखल भागातील पावसाचे पाणी उपसण्यासाठी लावण्यात आलेले पंप बंद पडले होते. अशा अनेक कारणांमुळे सामान्य मुंबईकरांना त्रास झाला आहे.
मात्र आता यापुढे असा कुठलाही त्रास किंवा हाल होणार नाहीत, याची खबरदारी म्हणून मान्सूनपूर्व रखडलेली कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश बैठकीत देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, सर्व संबंधित सहआयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त व अधिकारी उपस्थित होते.
सखल व अतिसखल भागांमध्ये जोरदार पावसावेळी पाणी साचू शकेल, अशा सर्व संभाव्य ठिकाणांवर मिळून 414 उदंचन संच लावण्याचे नियोजन यंदा केले आहे. त्यानुसार, सर्व ठिकाणी उदंचन संच (पंप सेट) बसविण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे, याची खातरजमा करावी. उदंचन यंत्रणा स्थापन करुन ती कार्यान्वित करण्याची कार्यवाही पुढील 24 तासात पूर्ण करावी. ही यंत्रणा सुरळीतपणे कार्यरत आहे, हे तपासण्यासाठी त्याची योग्य ती चाचणी घ्यावी. संपूर्ण कार्यवाही पूर्ततेसाठी आवश्यक त्या स्तरांवर समन्वयाने पाठपुरावा करावा अशा सूचना गगराणी यांनी दिल्या. फिरत्या उदंचन यंत्रणेचे (व्हेईकल माउंटेड मोबाईल पंप) 10 संच भाडेकरार तत्त्वावर प्राप्त करण्यासाठी कंत्राटदारांना सहमतीपत्र देण्यात आले आहेत. हे संच आठ दिवसांच्या आत उपलब्ध होतील. आणीबाणीच्या प्रसंगी या यंत्रणेचा वापर करता येईल, असेही गगराणी यांनी सांगितले.
रस्ते काँक्रिटीकरणातील उर्वरित कामे जलद गतीने पूर्ण करावीत. अपूर्ण राहिलेले रस्ते मास्टिकने करुन वाहतूकयोग्य करावेत. तसेच 24 तासांच्या आत रस्त्यावरील राडारोडा, रस्तारोधक (बॅरिकेड्स) आणि इतर साहित्य काढून ते गोदामांमध्ये न्यावेत. कोणत्याही स्थितीत रस्त्यांवर वाहनांना अडथळा राहणार नाही, याकडे लक्ष द्यावे, याबरोबच हाजीअली, लव्हग्रोव्ह, ब्रिटानिया आदी उदंचन केंद्रांतील पूरनियंत्रण दरवाजे वेळेत व योग्यरीत्या लावण्यात यावेत. दर दोन तासांनी त्यांची उघडझाप करून ते सुस्थितीत कार्यान्वित आहेत, याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला पुरविण्यात यावी, असे निर्देशसुध्दा दिले.
१. मुंबईतील अतिसखल, सखल भागात पाणी साचू नये, साचलेल्या पाण्याचा जलदगतीने निचरा व्हावा यासाठी अधिक प्रभावीपणे उपाययोजना राबवाव्यात.
२. सर्व परिमंडळांचे उप आयुक्त, सहायक आयुक्त यांनी दररोज सकाळ, सायंकाळ विभागात (वॉर्ड) प्रत्यक्ष कार्यस्थळी भेट देऊन पाहणी करावी.
३. पाणी उपसा करण्यासाठी तैनात केलेले उदंचन संच वेळेत सुरू होतील, याची खबरदारी घ्यावी.
४. काँक्रिट रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यावर तेथील पर्जन्य जलवाहिन्या योग्यरितीने स्वच्छ कराव्यात.
५. रस्त्यांवरील सर्व पर्जन्य जल वाहिन्या / सांडपाणी वाहिन्या यांच्या मॅनहोलवरील झाकणे तपासावीत.
६. कामाच्या वेळी पडलेले बांधकाम साहित्य / राडारोडा काढून टाकावे.
७. नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत.