Mumbai BMC Land Deal
मुंबई : अदानीसाठी धारावी पुनर्विकासामधील नागरिकांना देवनार डम्पिंग ग्राउंड येथील ११० एकर जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी डम्पिंग ग्राउंडमधील १८५ लाख टन जुन्या कचऱ्याची शास्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी मुंबई महापालिका स्वतःच्या तिजोरीतून २ हजार ३६८ कोटी रुपये खर्च करणार आहे.
धारावी पुनर्विकास प्रकल्पअंतर्गत येणाऱ्या नागरिकांना तात्पुरत्या निवासासाठी देवनार डम्पिंग ग्राउंडची जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या अगोदर मुलुंड डम्पिंग ग्राउंडची जागा उपलब्ध करून देण्यात येणार होती. मात्र येथील नागरिकांनी धारावीकरांना मुलुंडमध्ये घेण्यास विरोध केल्यामुळे आता देवनार डम्पिंग ग्राउंडमधील कचरा शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून मोकळ्या होणाऱ्या जागेत धारावीतील नागरिकांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात येणार आहे. त्याशिवाय विद्यमान निकषाशिवाय अपत्र ठरलेल्या धारावीकरांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याच्या विल्हेवाटीचे निर्देश दिल्यानंतर, महापालिकेने १८५ लाख टन जुन्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी २,३६८ कोटी रुपयांच्या निविदा मागवल्या आहेत. देवनारमधील जुन्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावल्यानंतर तब्बल ११० हेक्टर जागा मोकळी होणार आहे. या कचऱ्याच्या विल् हेवाटीसाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतर धारावीतील प्रकल्पग्रस्तांना म्हणजेच अदानींना पर्यायी घरांसाठी ही जागा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे पालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
राज्य मंत्रिमंडळाने देवनारच्या १२६.३० हेक्टर जमिनीपैकी ७०.८२ हेक्टर जमीन धारावी पुनर्विकास प्रकल्पाला (डीआरपी) हस्तांतरित करण्याचा आणि ५५ हेक्टर जमीन पालिकेकडे ठेवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.
देवनाड डम्पिंग ग्राउंडमधील कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी जून २०२५ पर्यंत कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील तीन वर्षांत या कंत्राटदारांमार्फत संपूर्ण देवनार डम्पिंग ग्राउंड कचरामुक्त करून मोकळा भूखंड महापालिकेच्या ताब्यात देणार आहे.
देवनार डम्पिंग ग्राउंडच्या सुरक्षेची जबाबदारी पुन्हा खासगी सुरक्षा रक्षकांवरच सोपवण्यात येणार असून, त्यासाठी २०२८ पर्यंत म्हणजे तीन वर्षांत सुमारे १० कोटी ३६ हजार रुपये खर्च केला जाणार आहे. देवनारच्या सुरक्षेसाठी १ सहाय्यक सुरक्षा अधिकारी, ४ सुरक्षा पर्यवेक्षक, ८ मुख्य सुरक्षा रक्षक, ८ सशस्त्र सुरक्षा रक्षक आणि ८५ सुरक्षा रक्षक असा ताफा असेल.
देवनार डम्पिंग ग्राउंडमधून दर तासाला सुमारे ६,२०० किलो मिथेन वायू सोडला जातो. त्यामुळे हा देशातील २२ प्रमुख हॉटस्पॉटपैकी एक असल्याची माहिती केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात उघडकीस आली आहे. नियंत्रण मंडळाने ठरवलेल्या मानकांनुसार, कचरा ते ऊर्जा प्रकल्प आणि निवासी क्षेत्रांमध्ये किमान ५०० मीटर अंतर असणे आवश्यक आहे.
, , , ,, , ,, ,, , , ,