Mumbai Road Inspection
मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या रस्ते कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे महापालिकेने तज्ज्ञ संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रस्त्याचे काम सुरू असताना त्याचा दर्जा या संस्थेमार्फत तपासला जाणार आहे.
मुंबई ३५० किमी पेक्षा जास्त सिमेंट काँक्रेट रस्त्याची कामे अंतिम टप्प्यात आहेत. यातील काही कामे निकृष्ट असल्याचे आरोप झाले आहेत. बुधवारी मुंबई उपनगरचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी केलेल्या पाहणीतही नवीन रस्त्यांची लेव्हल योग्य नसल्याचे व नियोजन शून्य कारभार दिसून आला. याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याची गंभीर दखल घेतमहापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी रस्त्यांच्या कामाकडे बारकाईने लक्ष देण्याचे निर्देश रस्ते विभागाच्या अभियंत्यांना दिले. त्यामुळे आता कंत्राटदारांच्या कामावर अभियंत्यांची नजर राहणार आहे.
दर्जावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेकडे तज्ज्ञ अभियंते नाहीत. त्यामुळे पालिकेने रस्त्यांच्या कामाची गुणवत्ता राखण्यासाठी तज्ज्ञ संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ ते २० दिवसांत या संस्थेची नियुक्ती करण्यात येणार आहे.
तज्ज्ञ संस्थेते वरिष्ठ अभियंत्यांसह अन्य अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. ही संस्था काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन रस्त्यासाठी किती प्रमाणात सिमेंट वापरले, त्याचा दर्जा, रस्त्याची जाडी, रस्त्यासाठी वापरण्यात आलेले अन्य साहित्य यांचे नमुना गोळा करणार आहे. हे नमुने तपासल्यानंतर रस्त्याचे काम दिलेल्या निकषानुसार झाले की, नाही याचा अहवाल तयार करण्यात येणार आहे.
तज्ज्ञ संस्था शहरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी करून आपला स्वतंत्र अहवाल तातडीने महापालिका अतिरिक्त आयुक्तांना सादर करणार आहे. या अहवालानुसार महापालिका प्रशासन रस्ते विभागाच्या अभियंत्यांचा कंत्राटदाराशी समन्वय साधून रस्त्याची कामे करणार आहे. एखाद्या रस्त्याची गुणवत्ता राखली गेली नसेल व तसा अहवाल समितीने सादर केला तर, केवळ कंत्राटदारावरच नाहीतर अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.