मुंबई : दुचाकी चोरायची, तिचे सुटे भाग वेगळे करायचे आणि नंतर ते भंगार अथवा सुट्या भागांच्या बाजारात विकायचे, अशी वाहनचोरीची नवी मोडस ऑपरेंडी मुंबईत दुचाकी चोरींच्या प्रकरणातील तपासामध्ये समोर आली आहे. दहिसर पोलिसांनी केलेल्या कारवाईत चोरीच्या आठ दुचाकींसह २४ वाहनांचे सुटे भाग जप्त केले. त्यामुळे वाहनचोरीमागे केवळ चोरीची वाहने विकण्याचे नेटवर्क नसून, त्यांचे सुटे भाग विकून कमाई करणारी साखळीही सक्रिय असल्याचा संशय आहे.
पूर्वी चोरीच्या दुचाकी परराज्यात विकणे, नंबरप्लेट बदलणे किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे त्या बाजारामध्ये वापरात आणणे, अशा पद्धतींचा वापर केला जात होता. शहरातील सीसीटीव्हीचे वाढते जाळे व पोलिसांचा तांत्रिक तपास यामुळे चोरीचे वाहन जसेच्या तसे ठेवणे चोरट्यांसाठी धोकादायक ठरत आहे. त्यामुळे वाहनाची ओळखच नष्ट करून सुटे भाग स्वतंत्रपणे विकण्याचा मार्ग स्वीकारला जात असल्याचे पोलिसांच्या कारवायांतून दिसून येत आहे.
दहिसरमध्ये आठ दुचाकींचा पर्दाफाश
दहिसर पोलिसांनी नुकतीच केलेल्या कारवाईत चोरीच्या आठ दुचाकी आणि २४ वाहनांचे विविध सुटे भाग जप्त केले. चोरीची वाहने एका ठिकाणी लपवून ठेवून त्यांचे भाग वेगळे करण्याचा प्रकार सुरू असल्याचे तपासात समोर आले. या वाहनांचे भाग पुढे कुठे विकले जाणार होते, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे आणि यापूर्वी किती वाहने अशा पद्धतीने गायब करण्यात आली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.चोरीच्या दुचाकीचे महत्त्वाचे भाग वेगळे केल्यानंतर संपूर्ण वाहन पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता कमी होते. त्याचबरोबर चोरट्यांना प्रत्येक भाग स्वतंत्रपणे विकल्यास त्यातून अधिक कमाई होण्याची शक्यता असते.
सीसीटीव्हीपासून सुटे भाग बाजारापर्यंत तपास
दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज, वाहनाचा शेवटचा ठावठिकाणा, नंबरप्लेट व तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्यांचा माग काढला जातो. वाहनाचे भाग वेगळे करून ते विविध ठिकाणी विकले गेल्यास तपास अधिक गुंतागुंतीचा होतो.
भंगार विक्रेत्यांवर नजर
या प्रकारामुळे पोलिसांनी आता भंगार विक्रेते आणि वाहनांचे जुने सुटे भाग विकणाऱ्यांवरही लक्ष केंद्रित केले आहे. कागदपत्रे नसलेले किंवा स्रोत स्पष्ट नसलेले वाहनांचे भाग खरेदी करणाऱ्यांची माहिती घेतली जात आहे. चोरीच्या वाहनांचे भाग स्वीकारणाऱ्या व्यक्ती किंवा साखळीचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते.
मोडस ऑपरेंडी
दुचाकी चोरी, वाहन लपवणे,सुटे भाग वेगळे करणे, ओळख पटणारे भाग बदलणे किंवा नष्ट करणे, भंगार/सुट्या भागांच्या बाजारात विक्री करणे ही मोडस ऑपरेंडी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चोरीच्या दुचाकींच्या विल्हेवाटीसाठी सुट्या भागांचा बाजार व भंगार साखळीचा वापर होत असल्याचा संशय बळावला आहे.