मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील एल्फिन्स्टन इस्टेट येथे बिहारींसाठी अत्याधुनिक बिहार भवन उभारण्याचा निर्णय बिहारमधील भाजप-जदयू सरकारने घेतला असून 314 कोटी खर्चून 30 मजल्यांचे हे भवन बांधले जाणार आहे.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत उत्तर प्रदेश आणि बिहारमधून मोठ्या प्रमाणात लोंढे येत असतात. गेल्या काही वर्षांत या दोन राज्यांतून येणाऱ्यांची संख्या लक्षणीय असून रोजीरोटीसाठी आलेले उत्तर प्रदेश आणि बिहारचे नागरिक मुंबईतच स्थायिक झाले आहेत. या बिहारी मंडळींसाठी तसेच बिहारचे प्रशासकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून मुंबईत बिहार भवन बांधण्याचा निर्णय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी घेतला आहे.
या बिहार भवनाच्या उभारणीवरून आतापासूनच विरोधाचा सूर उमटू लागला आहे. मात्र,भारतीय जनता पक्षाने त्याचे समर्थन केले आहे. भाजपा प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले की, काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन उभे राहात आहे. उत्तर प्रदेशमध्येही महाराष्ट्र भवन साकारत आहे. अन्य राज्यांकडून अशा वास्तू उभारल्या जात असतात. त्यामुळे बिहार भवनच्या निर्मितीला कोणाचाही विरोध असण्याचे काहीही कारण नाही.
मुंबईत कोणत्याही परिस्थितीत बिहार भवन उभारू देणार नाही, असा इशारा मनसेचे महानगरपालिकेतील नवनियुक्त गटनेते यशवंत किल्लेदार यांनी सोमवारी दिला. मुंबईतील प्रस्तावित बिहार भवनला मनसेचा विरोध असेल. इथे बिहार भवन कशाला? उपचारासाठी येणाऱ्या बिहारमधील लोकांसाठी 314 कोटी खर्च करून बिहार भवन उभारण्याचा घाट त्यांच्या सरकारने घातला आहे. मात्र, इतका खर्च इथे करण्यापेक्षा हेच पैसे बिहारमध्ये उपचारांची व्यवस्था उभारण्यात त्यांनी खर्चावे, अशी भूमिका किल्लेदार यांनी स्पष्ट केली.
बिहार भवनाचा हा भव्य प्रकल्प मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील एल्फिन्स्टन इस्टेट येथे उभारला जाईल.
बिहार भवनासाठी 2 हजार 752.77 चौरस मीटर क्षेत्रफळाची जमीन निश्चित करण्यात आली असून 314.20 कोटी खर्च करून बिहार भावनाची उभारणी केली जाईल.
प्रस्तावित बिहार भवन हे 30 मजली असेल.
बेसमेंटसह या इमारतीची एकूण उंची सुमारे 69 मीटर इतकी असू शकेल.
ही इमारत पूर्णपणे आधुनिक वास्तुशैलीत उभारताना पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
दिल्लीतील बिहार भवनाप्रमाणेच मुंबईतील हे बिहार भवनदेखील सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल.
शासकीय कामकाजासाठी कार्यालये, बैठकींसाठी सभागृहे तसेच अत्याधुनिक पार्किंग व्यवस्था या बिहार भवनात असेल.