

Shiv Sena Municipal Election Results
मुंबई : राज्यातील २९ जिल्ह्यांतील नगरपालिका निवडणुकांत अपेक्षित निकाल न लागल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता ‘भाकरी फिरवण्याची’ तयारी सुरू केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. विशेष म्हणजे या निवडणुकांमध्ये पक्षातील मंत्री आणि आमदारांची कामगिरी समाधानकारक नसल्यामुळे शिंदे प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.
पालिका निवडणुकांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी पक्षातील विविध मंत्री आणि आमदारांवर वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी सोपवली होती. त्या त्या जिल्ह्यात संघटन मजबूत करणे, स्थानिक नेत्यांमध्ये समन्वय साधणे आणि निवडणूक निकाल पक्षाच्या बाजूने वळवणे, अशी स्पष्ट अपेक्षा त्यांच्याकडून ठेवण्यात आली होती. मात्र निवडणूक निकाल पाहता, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या काही मोजक्या भागांव्यतिरिक्त इतर बहुतांश जिल्ह्यांमध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर जबाबदारी सोपवण्यात आलेल्या काही मंत्र्यांची कामगिरी सुमार ठरल्याची गंभीर दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असल्याचे समजते. त्यामुळेच पक्षासाठी अपेक्षित निकाल न देऊ शकलेल्या आणि संघटनात्मक पातळीवर अपयशी ठरलेल्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची शक्यता बळावली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पालिका निवडणुकांपूर्वीच एकनाथ शिंदे यांनी पक्षातील मंत्र्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला होता. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नगराध्यक्षपदाच्या निवडणुका या पक्षातील मंत्र्यांसाठी ‘लिटमस टेस्ट’ असतील, असे संकेत त्यांनी दिले होते. त्यामुळे या निवडणुकांच्या निकालांवरून मंत्र्यांची कामगिरी तपासली जाणार, हे जवळपास निश्चित होते.
आता या निवडणुकांमध्ये अपेक्षित कामगिरी न करणाऱ्या मंत्र्यांकडील जबाबदाऱ्या काढून घेऊन नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा शिंदे यांचा विचार असल्याचे बोलले जात आहे. पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी आणि संघटन बळकट करण्यासाठी मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नगराध्यक्षपदाच्या निवडणुकांमध्ये पक्ष काही ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर राहिला असला, तरीही नेतृत्वाकडून अपेक्षित कामगिरी झाली नसल्याची भावना पक्षश्रेष्ठींमध्ये आहे. त्यामुळे येत्या काळात मंत्रिमंडळातून नेमका कोणाला डच्चू मिळतो आणि कुणाच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडते, याकडे राज्याचे राजकीय वर्तुळ उत्सुकतेने पाहत आहे.