मुंबई : मुंबईतील चौपाट्यांवर पर्यटकांसाठी स्वच्छतागृहासह वस्तू ठेवण्यासाठी लॉकर व कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेने केली आहे. तसा प्रस्तावही ठरावाच्या सूचनेद्वारे महापालिका सभागृहाच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. त्यामुळे सभागृह आता काय निर्णय घेणार, यावर चौपट्यांवर सेवासुविधा उपलब्ध होणार की नाही हे ठरणार आहे.
मुंबई शहराला मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. गेटवे ऑफ इंडियासह मरीन ड्राईव्ह, गिरगाव, दादर, माहीम, खार, जुहू, सात बंगला, वेसावे, गोराई, आक्सा, मार्वे अशा मोठ्या चौपाट्या आहेत. या चौपाट्यांवर दररोज हजारो पर्यटक फेरफटका मारण्यासाठी येतात. अनेकजण समुद्राच्या पाण्यात डुबकीही मारतात. पण भिजलेले कपडे बदलण्यासाठी चौपाटीवर कोणतीही सेवासुविधा नाही. त्यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे चौपाटी लगत स्वच्छतागृहाचीही कमतरता असून पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही. त्यामुळे पर्यटकांना एखाद्या आडोशाला जाऊन आपले कपडे बदलावे लागत आहेत. 2022 मध्ये महानगरपालिकेने प्रमुख 8 समुद्रकिनाऱ्यांवर फिरत्या शौचालयांना मान्यता दिली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. केवळ गणेश विसर्जनाच्या वेळी फिरती शौचालये उपलब्ध करून दिली जातात.
चौपाटींवर कोणतीही सेवासुविधा नसल्यामुळे समुद्रकिनाऱ्यांवर येणाऱ्या पर्यटकांची विशेषतः महिलांची अत्यंत गैरसोय होते. यासाठी शहरातील किमान प्रमुख चौपट्यांवर पर्यटकांसाठी अद्ययावत स्वच्छतागृहे, कपडे बदलण्याच्या खोल्या, सामान ठेवण्यासाठी लॉकर, आदी आवश्यक त्या सुविधा महानगरपालिकेकडून सशुल्क पुरविण्यात याव्यात, अशी मागणी वजा ठरावाची सूचना शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका यामिनी जाधव यांनी महापालिका सभागृहात मांडली आहे. मार्चमध्ये होणाऱ्या महापालिका सभागृहात या ठरावाच्या सूचनेवर चर्चा होणार आहे. त्यामुळे या सूचनेला मुंबई महानगरपालिका सभागृह मंजुरी देणार का, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
चौपाट्यांवर सेवासुविधा उपलब्ध करणे शक्य आहे. चौपाट्यांवर फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना किमान स्वच्छतागृहासह पिण्याचे पाणी व भिजलेले कपडे बदलण्यासाठी महिला-पुरुषांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे शक्य आहे. परंतु महापालिका सभागृहात ठराव मंजूर झाल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार महापालिका आयुक्तांना असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.