Mumbai Azad Maidan pudhari photo
मुंबई

Mumbai Azad Maidan : ऐतिहासिक आझाद मैदानावर क्रिकेटचे पुनरागमन

९ वर्षांनंतर एमसीएच्या ताब्यात ८ खेळपट्ट्या; १६ क्लब्जना बसला होता मेट्रो प्रकल्पाचा फटका

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईसह आणि भारतीय क्रिकेटची नर्सरी असलेल्या ऐतिहासिक आझाद मैदानावर क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. तब्बल नऊ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर या मैदानातील आठ क्लब्सना त्यांच्या नूतनीकरण केलेल्या खेळपट्ट्या परत मिळणार आहेत. मुंबई मेट्रो ३ च्या बांधकामासाठी एमएमआरडीएने २०१७ मध्ये संबंधित क्लब्सच्या जागा ताब्यात घेतल्या होत्या.

आझाद मैदानातील २२ पैकी १६ क्लब्सना मेट्रो प्रकल्पाचा फटका बसला. यामध्ये पारसी सायक्लिस्ट्स, बॅरोनेट, जॉन ब्राइट, बोहरा क्रिकेटर्स आणि नवरोज यांसारख्या प्रमुख क्लब्सचा समावेश होता.

या मैदानावर एकेकाळी एकावेळी २२ सामने खेळले जात असत. परंतु, मेट्रो प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्याची क्षमता जवळपास निम्म्यावर आली होती. ज्या क्लब्सना खेळपट्ट्या परत मिळाल्या आहेत. त्यात आरबीआय, सेंट झेवियर्स, यंग फ्रेंड्स युनियन, यंग मुस्लिम, मुस्लिम युनायटेड, किला कोर्ट, बोहरा क्रिकेट क्लब आणि जॉन ब्राइट यांचा समावेश आहे. यापैकी काही क्लब्सना १०० हून अधिक वर्षांचा इतिहास आहे.

आझाद मैदान हे खऱ्या अर्थाने मुंबई क्रिकेटचे उगमस्थान किंवा क्रिकेटपटूंच्या जडणघडणीचे केंद्र आहे. जागतिक स्तरावर नोंद घेतलेल्या हॅरिस आणि गाइल्स शील्ड या शालेय स्पर्धा, कांगा लीग आणि टाइम्स शील्ड यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण स्पर्धा या मैदानावर खेळवल्या जातात. विक्रमवीर सचिन तेंडुलकरपासून ते टी-ट्वेंटी वर्ल्डकप विजेता माजी कर्णधार रोहित शर्मा, माजी महान कर्णधार अजिंक्य रहाणे तसेच यशस्वी जैस्वाल, पृथ्वी शॉ आणि सर्फराज खान यांच्यासारखा मुंबईच्या अनेक दिग्गज फलंदाजांनी आझाद मैदानावरच आपल्या कौशल्याला पैलू पाडले आहेत.

आझाद मैदानावर क्लब्सना परत दिल्या जाणाऱ्या या आठ खेळपट्ट्यांचे नूतनीकरण मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अपेक्स कौन्सिलचे सदस्य आणि मैदान समन्वयक नदीम मेमन व प्रमोद यादव यांनी केले आहे. आझाद मैदानावर क्रिकेटचे पुनरागमन झाल्याचा मोठा आनंद आहे. सर्व मुंबईकर आणि क्रिकेटप्रेमींसाठी हा अभिमानाचा आणि भावूक क्षण आहे. मेट्रो रेल्वेच्या कामामुळे तब्बल ९ वर्षे बंद असलेली आझाद मैदानातील एमसीए संलग्न आठ क्लब्सची क्रिकेट खेळपट्ट्या (पिचेस) आता पुन्हा एकदा खेळण्यायोग्य स्थितीत आल्या आहेत.

मुंबई क्रिकेटसाठी हे खरोखरच स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर, क्रिकेट खेळपट्ट्या आणि आउटफील्ड पूर्ववत करणे व त्यांचा विकास करणे हे एक मोठे आव्हान होते. संपूर्ण मैदान राडारोडा आणि बांधकामाच्या साहित्याने व्यापलेले असल्याने हे काम अत्यंत कठीण झाले होते. एमसीएची मैदान समिती, ग्राऊंड स्टाफ आणि या प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्वांच्या कठोर परिश्रमांमुळे व सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे, खेळपट्ट्या आणि आउटफील्ड पुन्हा एकदा अशा दर्जाच्या बनल्या आहेत जिथे क्रिकेट खेळले जाऊ शकते, असे अनुभवी क्युरेटर नदीम मेमन यांनी सांगितले.

आम्ही तळागाळातील (ग्रासरूट) क्रिकेटला बळकट करण्याला कायम प्राधान्य दिले आहे. कारण तोच मुंबई क्रिकेटचा पाया आहे. क्रिकेटपटूंच्या पुढील पिढीला घडवण्यासाठी मैदानांवरील क्लब्सना (मैदान क्लब) उत्तम सुविधा आणि पाठिंबा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अजिंक्य नाईक यांनी म्हटले आहे.

एकावेळी २२ सामने खेळले जायचे

आझाद मैदानावर एकेकाळी एकाच वेळी २२ सामने खेळले जात असत. परंतु, मेट्रो प्रकल्प सुरू झाल्यानंतर त्याची क्षमता जवळपास निम्म्यावर आली होती. ज्या क्लब्सना खेळपट्ट्या परत मिळाल्या आहेत. त्यात आरबीआय, सेंट झेवियर्स, यंग फ्रेंड्स युनियन, यंग मुस्लिम, मुस्लिम युनायटेड, किला कोर्ट, बोहरा क्रिकेट क्लब आणि जॉन ब्राइट यांचा समावेश आहे. यापैकी काही क्लब्सना १०० हून अधिक वर्षांचा इतिहास आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT