मुंबई : रस्त्‍यात वाहन चालवण्याचा परवाना विचारण्या ऐवजी मराठी भाषेचे मोजके प्रश्न विचारून परीक्षा घेतली जाईल याची कल्पनाही कधी या चालकांनी केली नसेल. गुरुवारी मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात ही मोहीम सुरु झाली. pudhari photo
मुंबई

Maharashtra taxi driver rules : रिक्षा-टॅक्सी चालकांची मराठी भाषा चाचणी सुरु

मोहिमेच्या पहिल्याच दिवशी मुंबईत ४१, ठाण्यात ३७ चालकांना नोटिसा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई/ठाणे : राज्यातील रिक्षा- टॅक्सी चालकांना व्यवहारापुरते तरी मराठी येते की नाही याची झाडाझडती गुरुवारपासून परिवहन विभागाने सुरू केली आणि पहिल्याच दिवशी एकट्या मुंबईत १ हजार ३३० वाहनचालकांची भाषा चाचणी घेण्यात आली. त्यापैकी ४१० चालकांना व्यावहारिक मराठी येत नसल्याने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ठाण्यातही मराठी न येणाऱ्या ३७ रिक्षाचालकांना नोटीस बजावण्यात आली.

या तपासणी मोहिमेसाठी खास भरारी पथक रस्त्‍यावर उतरले असून हाती असलेल्या तयार तक्त्‍यांच्या आधारे हे पथक रिक्षा-टॅक्सी चालकांना थांबवून त्यांचे मराठी तपासत आहे. १५ व्यवहारोपयोगी प्रश्नांपैकी किमान ४-५ प्रश्नांची समाधानकारक उत्तरे चालकांनी देणे बंधनकारक आहे. त्‍यात नापास झालेल्या ४१० चालकांना नोटिसा मुंबईत देण्यात आल्या.

राज्यातील आकडेवारीनुसार ४,२२२ चालकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ६६४ चालकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. ही तपासणी मोहीम ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. नोटिस दिल्यानंतर एक महिन्याच्या मुदतीतही मराठी शिकण्यात अपयशी ठरल्यास, या चालकांचा बॅज ३ महिन्यांसाठी निलंबित केला जाणार आहे.

महाराष्ट्रात व्यवसाय करून प्रवाशांशी थेट संवाद साधणाऱ्या व्यावसायिक वाहनचालकांना व्यवहारिक मराठी येणे ही केवळ नियमांची बाब नाही, तर प्रवाशांच्या सोयी-सुरक्षेशी संबंधित बाब आहे. चालकांना मराठी शिकण्यासाठी पुरेसा कालावधी दिला जात आहे. मात्र, दिलेल्या मुदतीनंतरही नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

ठाण्यातही कारवाईला सुरुवात

ठाण्यात मराठी भाषेचे प्राथमिक ज्ञान नसलेल्या रिक्षाचालकांविरोधात प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाने धडक कारवाई सुरू केली असून आरटीओच्या १२ अधिकाऱ्यांच्या सहा विशेष पथकांनी ठाणे रेल्वे स्थानक, वागळे इस्टेट, माजिवडा, खोपट, कळवा आणि मुंब्रा परिसरात सुमारे ४५० रिक्षांची तपासणी केली. यापुढील काळातही जिल्ह्यातील सहाही ठिकाणी तपासणीची मोहीम सुरू राहणार असल्याचे आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईतील कारवाई

१) ताडदेव आरटीओ

तपासलेले वाहनधारक - ३८५

नापास वाहनधारक - ९४

२) बोरिवली आरटीओ

तपासलेले वाहनधारक - ३५०

नापास वाहनधारक - १०१

३) अंधेरी आरटीओ

तपासलेले वाहनधारक - ४०३

नापास वाहनधारक - १४०

४) वडाळा आरटीओ

तपासलेले वाहनधारक - १९२

नापास वाहनधारक - ७५

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT