Mumbai Auto Rickshaw Driver Income
मुंबई : मुंबईतील अमेरिकन वाणिज्य दूतावासाबाहेर एक ऑटो चालक दरमहा 5 ते 8 लाख कमावत असल्याचा दावा बंगळुरूच्या एका उद्योजकाने सोशल मीडियावर केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. व्हेन्यूमाँकचे सह-संस्थापक राहुल रुपाणी यांनी ‘लिंक्डइन’वर पोस्ट शेअर करत असा दावा केला आहे की, ऑटोचालक अमेरिकन वाणिज्य दूतावासाबाहेर पर्यटकांचे सामान सुरक्षित ठेवतो आणि या सेवेसाठी तो 1,000 आकारतो. त्यामुळे तो गाडी न चालवताही दरमहा 5 ते 8 लाख रुपये कमवतो.
रुपाणी यांनी पुढे सांगितले की, त्या ऑटो ड्रायव्हरने जवळच एक लहान लॉकर स्पेस असलेल्या स्थानिक पोलीस अधिकार्यासोबत भागीदारी केली आहे. तो वाणिज्य दूतावासातील अभ्यागतांकडून गोळा केलेल्या सर्व बॅगा त्या लॉकरमध्ये ठेवतो आणि बहुतेक लोक अमेरिकन व्हिसा, मुलाखतींसाठी घाम गाळत असताना, हा माणूस शून्य-मैल, अति-नफा देणारा व्यवसाय चालवतो.
रुपानी यांनी पोस्ट शेअर केल्याबद्दल काहींनी त्यांचे कौतुक केले, तर काहींनी शंका आणि प्रश्न उपस्थित केले. एका व्यक्तीने पोस्ट केले, हे त्याच्या कमाईमध्ये पोलिसांसह अनेकांचा वाटा असेल, मग एवढे उत्पन्न त्याचे एकट्याचे कसे? तसेच, वाणिज्य दूतावासात 500 रुपयांच्या शुल्कात लॉकर सुविधा आहे. मग लोक त्याला पैसे देऊन ही सेवा का घेतात?
दुसर्याने पुढे म्हटले की, लोक त्यांच्या सुरक्षिततेची खात्री बाळगून विश्वासाने त्यांच्या बॅगा आणि सामान त्याच्याकडे ठेवतात. अनोळखी लोकांचा विश्वास संपादन करणे हे काही छोटेसे काम नाही. हे खरोखरच प्रभावी आहे.