मुंबई : प्रदूषणात मोठी घट झाल्याने मुंबईची हवा पालटली आहे. हवा गुणवत्ता निर्देशांकच्या (एक्यूआय) संकेतस्थळानुसार, शनिवारी मुंबईचा सरासरी एक्यूआय 64 इतका खाली आला.
बुधवार ते गुरुवार असे सलग तीन दिवस सरासरी एक्यूआय हा 112 ते 122च्या दरम्यान होता. आठवड्याच्या शेवटी त्यात आणखी घट झाली. शुक्रवारच्या (117) तुलनेत शनिवारी हवा गुणवत्ता निर्देशांकमध्ये 53 अंकांनी घट झाली.
यंदाच्या (2026) वर्षातील हा सर्वात कमी एक्यूआय आहे. प्रदूषणाचा टक्का कमी झाल्याने मुंबईकरांनी मोकळा श्वास घेतला आहे. शनिवारी गावदेवी (33) परिसरात सर्वात कमी प्रदूषणाची नोंद झाली.
तसेच न्यू नेव्ही नगर, कुलाबा आणि ब्रीच कँडी (प्रत्येकी 39), महालक्ष्मी (42), वाळकेश्वर आणि माउंट मेरी, वांद्रे (प्रत्येकी 44), जुहू, मालाड, वरळी आणि माझगाव (प्रत्येकी 46), परळ भोईवाडा, वांद्रे, प्रभादेवी, सांताक्रुझ आणि विलेपार्ले (प्रत्येकी 50) अशा प्रमुख 15 ठिकाणचा एक्यूआय हा पन्नासच्या आत होता.