मुंबई विमानतळाच्या टी 1-ए इमारतीचे पाडकाम सुरू  pudhari photo
मुंबई

Mumbai airport T1A demolition : मुंबई विमानतळाच्या टी 1-ए इमारतीचे पाडकाम सुरू

इमारतीचा वापर बंद असल्याने प्रवासी वाहतुकीवर परिणाम नाही

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टी 1 - ए इमारतीच्या पाडकामाला सुरुवात करण्यात आली आहे. ही इमारतीचा वापर 2016पासूनच बंद करण्यात आल्याने पाडकामाचा परिणाम विमानतळाच्या कामकाजावर व वाहतुकीवर होणार नाही.

जुन्या मुंबई विमानतळाचे टी 1 - ए, टी - 2 बी आणि टी 1 सी असे तीन भाग आहेत. यापैकी टी 1 ए या इमारतीचा वापर 2005 पर्यंत भारतीय विमानकंपन्यांकडून केला जात होता. त्यानंतर किंगफिशर एअरलाइन्सकडूनही याचा वापर सुरू झाला. किंगफिशरची विमानसेवा बंद झाल्यानंतर ही इमारत गो एअर कंपनीला देण्यात आली. त्यानंतर काही वर्षांनी गो एअर आणि एअर इंडिया या कंपन्यांचे कामकाज टी 1 बी आणि टी 2 येथून सुरू करण्यात आले. त्यामुळे टी 1 ए ही इमारत प्रवाशांसाठी बंद करण्यात आली. 2017 पासून टी 1 बी हीच इमारत टी 1 म्हणून ओळखली जाते.

टी 1 ए इमारतीच्या पाडकामासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कंपनीला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. टी 1 ए इमारतीसोबतच येथील उन्नत मार्ग, तात्पुरते छत, इत्यादी बांधकामेही पाडली जाणार आहेत. सहार विमानतळाच्या पाडकामाचा अनुभव असलेल्या कंपनीलाच टी 1 ए च्या पाडकामाचे काम देण्यात आले आहे.

पूर्ण टी-1 बंद होण्यास अवकाश

  • टर्मिनल 1 बंद केले जाणार असल्याची घोषणा विमानतळ प्रशासनाने जानेवारीमध्ये केली होती. त्याची सुरुवात टी 1 ए पासून केली जात आहे. मात्र नवी मुंबई विमानतळाचे टर्मिनल 2 प्रवाशांसाठी सुरू झाल्याशिवाय मुंबई विमानतळाचे संपूर्ण टी 1 बंद करता येणार नाही. त्यामुळे टी 1 पूर्णपणे बंद होण्यास अजून बराच अवकाश आहे. नवी मुंबई विमानतळाचे टी 2 सुरू झाल्यानंतर मुंबई विमानतळाचे टी 1 पूर्ण बंद केले जाईल व त्यानंतर नव्याने बांधकाम करून विमानतळाची क्षमता वाढवली जाईल. सध्या मुंबई विमानतळावरून दरवर्षी 15 दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. क्षमतावाढीनंतर 20 दशलक्ष प्रवासी दरवर्षी प्रवास करू शकतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT