Mumbai Airport  Pudhari
मुंबई

Gold Smuggling: मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा 'गोल्डन रूट' पुन्हा सक्रिय? 'इनसाइडर' नेटवर्कमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

गेल्या काही आठवड्यांतील कारवायांवर नजर टाकल्यास तस्करीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अवघ्या तीन आठवड्यांत सोन्याच्या तस्करीची एकामागून एक मोठी प्रकरणे उघडकीस आल्याने तस्करांनी पुन्हा या विमानतळाला लक्ष्य केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नुकत्याच केलेल्या कारवाईत महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) फिलिपिन्सच्या तीन नागरिकांसह सहा जणांना अटक करून ७.४९ कोटी रुपये किमतीचे ५ किलोहून अधिक सोने जप्त केले. विशेष म्हणजे, या रॅकेटमध्ये विमानतळावरील तीन कर्मचाऱ्यांचाही सहभाग समोर आल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

गेल्या काही आठवड्यांतील कारवायांवर नजर टाकल्यास तस्करीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. जूनअखेरीस डीआरआयने विमानतळावरील कर्मचाऱ्यासह आठ जणांना अटक करून ८.९५ कोटींचे सोने जप्त केले होते. त्यानंतर जुलैच्या सुरुवातीला बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून १.२ कोटींचे सोने, त्यानंतर सिंगापूरहून आलेल्या प्रवाशाकडून २.५ कोटींचे सोने आणि इंडोनेशियाच्या महिलेकडून ६ कोटींचे सोने जप्त करण्यात आले.

तपास यंत्रणांच्या मते, तस्कर आता केवळ 'कुरिअर' प्रवाशांवर अवलंबून नसून विमानतळातील काही कर्मचाऱ्यांची मदत, ट्रान्झिट प्रवाशांचा वापर आणि परदेशातील समन्वयकांच्या माध्यमातून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने तस्करी करत आहेत. त्यामुळे डीआरआय, सीमाशुल्क विभाग आणि इतर केंद्रीय यंत्रणांनी विमानतळावरील गुप्त माहिती संकलन आणि जोखीम विश्लेषण अधिक तीव्र केले आहे.

सलग उघडकीस आलेली प्रकरणे

२४ जून: ८.९५ कोटींचे सोने; विमानतळ कर्मचाऱ्यासह ८ जण अटक

२ जुलै: बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून १.२ कोटींचे सोने जप्त

७ जुलै: इंडोनेशियाच्या महिलेकडून ६ कोटींचे सोने जप्त

९ जुलै: सिंगापूरहून आलेल्या प्रवाशाकडून २.५ कोटींचे सोने जप्त

१७ जुलै: आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश; फिलिपिन्सच्या तिघांसह ६ जण अटक, ७.४९ कोटींचे सोने जप्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT