Mumbai Airport Gold Smuggling Pudhari
मुंबई

Mumbai Airport Gold Smuggling: मुंबई विमानतळावर ५ कोटींचे सोने जप्त

विमान कंपनीचे कर्मचारी, परदेशातून येणारे प्रवासी यांच्या संगनमतातून तस्करी सुरू असल्याचे समोर आले आहे.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून परदेशी बनावटीच्या सोन्याची तस्करी करणारे संघटित जाळे महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) उद्ध्वस्त केले.

कारवाईत ३.४७ किलो सोन्याची धूळ मेणाच्या आठ कॅप्सूलमध्ये लपवून आणल्याचे उघड झाले. जप्त सोन्याची किंमत ५ कोटी ४७ लाख आहे. विमान कंपनीचे कर्मचारी, परदेशातून येणारे प्रवासी यांच्या संगनमतातून तस्करी सुरू असल्याचे समोर आले आहे.

डीआरआयच्या मुंबई विभागीय पथकाला मिळालेल्या विशिष्ट माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली. विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर एका विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यावर अधिकाऱ्यांनी पाळत ठेवली. संबंधित कर्मचारी विमानतळापासून सुमारे ५० किलोमीटर दूर गेल्यानंतर त्याला अडविण्यात आले. त्याची झडती घेतली असता सोन्याची धूळ असलेल्या मेणाच्या तीन कॅप्सूल आढळल्या.

चौकशीत या कर्मचाऱ्याने विमानतळाच्या संक्रमण कक्षात एका प्रवाशाकडून सोने घेतल्याची माहिती दिली. दरम्यान, विमानतळांवर सोने तस्करी वाढली आहे. त्यामुळे याला रोखण्यासाठी महसूल गुप्तचर संचालनालयापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या आव्हानांना सामाेरे जाण्यासाठी कोणती पावले उचलली जाणार याकडे लक्ष लागले आहे.

आठ कॅप्सूलमध्ये ३.४७ किलो सोने

संपूर्ण कारवाईत सोन्याची धूळ मेणाच्या स्वरूपात लपविलेल्या आठ कॅप्सूल जप्त करण्यात आल्या. त्यामध्ये एकूण ३.४७ किलो सोने असल्याचे आढळले. सीमा शुल्क कायदा, १९६२ अंतर्गत हे सोने जप्त करण्यात आले आहे. तस्करीमागील मुख्य सूत्रधार, परदेशातील संपर्क आणि यापूर्वी अशाच पद्धतीने करण्यात आलेल्या तस्करीचा तपास डीआरआयकडून सुरू आहे.

दुबईहून आलेल्या प्रवाशांवर पाळत

कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनंतर डीआरआयने दोन भारतीय प्रवाशांवर पाळत ठेवली. हे दोन्ही प्रवासी मस्कत आणि दुबईहून मुंबईत आले होते. ते विमान कंपनीच्या कर्मचाऱ्याकडे सोने सुपूर्द करत असताना त्यांना पकडण्यात आले. या कारवाईनंतर तस्करीच्या व्यवहाराचे समन्वय करणाऱ्या कथित हँडलरलाही ताब्यात घेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT