मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भोवताली असणाऱ्या झोपड्या तोडण्याचे नियोजन असून यामुळे साधारण 50 ते 100 एकरचा भूखंड विमानतळाच्या विस्तारासाठी मोकळा होईल. मात्र तत्पूर्वी झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.
पुनर्वसन प्रक्रियेत पात्र झोपडीधारकांना विमानतळाच्या जागेवर किंवा जवळपासच्या परिसरात घर दिले जाणार आहे. अपात्र झोपडीधारकांनाही अन्य काही पर्याय दिले जातील. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानसेवा सुरू झाल्यामुळे मुंबई विमानतळावरील वाहतूक काही प्रमाणात नवी मुंबईला वळवण्यात येणार आहे.
जुन्या मुंबई विमानतळाचे टी 1 - ए, टी - 2 बी आणि टी 1 सी असे तीन भाग आहेत. यापैकी टी 1 ए या इमारतीचा वापर 2005 पर्यंत भारतीय विमानकंपन्यांकडून केला जात होता. गेल्या काही वर्षांपासून ही इमारत प्रवाशांसाठी बंद करण्यात आली. 2017 पासून टी 1 बी हीच इमारत टी 1 म्हणून ओळखली जाते. टी 1 ए इमारतीसोबतच येथील उन्नत मार्ग, तात्पुरते छत, इत्यादी बांधकामेही पाडली जाणार आहेत.
नवी मुंबई विमानतळाचे टी-2 सुरू झाल्यानंतर मुंबई विमानतळाचे टी-1 पूर्ण बंद केले जाईल व त्यानंतर नव्याने बांधकाम करून विमानतळाची क्षमता वाढवली जाईल. सध्या मुंबई विमानतळावरून दरवर्षी 15 दशलक्ष प्रवासी प्रवास करतात. क्षमतावाढीनंतर 20 दशलक्ष प्रवासी दरवर्षी प्रवास करू शकतील. विस्तारीकरणासाठी भोवतालच्या झोपडपट्टीचा पुनर्विकास करून भूखंड मोकळा केला जाईल.