मुंबई : मुंबईत वायूप्रदूषणाचा विषय अत्यंत गंभीर होत चालला असून, शहराच्या काही भागांमधून लोक धोक्याच्या छायेत राहत आहेत. वडाळा, चेंबूर आणि आजूबाजूच्या परिसरात तर अक्षरश: विषारी हवेचे ढग तरंगत असतात. त्यातून अमोनिया आणि इतर धोकादायक वायू हा परिसर दरदिवशी व्यापत असतात.
विशेषत: राष्ट्रीय केमिकल ॲण्ड फर्टिलायझर्स अर्थात आरसीएफमधून निघत असलेल्या विषारी वायूंमुळे येथील सर्वांचेच आयुष्य धोकादायक पातळीवर येऊन ठेपले आहे. या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना गेल्या अनेक दशकांपासून डोळे चुरचुरणे, त्वचेला खाज येणे, घशाचा संसर्ग होणे, श्वास घ्यायला त्रास होणे, तीव्र डोकेदुखी तसेच रात्रीची झोप न लागणे असे आरोग्याचे प्रश्न सतावत आहेत. त्याचबरोबर अत्यंत घाणेरडा वास सहन करावा लागतो.
सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि इतर विषारी घटक हवेत मिसळत असून, ते केवळ फुप्फुसांनाच निकामी करत नाहीत तर शरीरातील अनेक अवयवांवर त्यांचा परिणाम होत आहे. या संबंधीच्या अनेक तक्रारी स्थानिकांकडून सातत्याने होत आहेत.
या धोकादायक परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याकडे सुमारे 3 हजार नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्या तक्रारीची दखल घेऊन वायूप्रदूषण रोखण्यात सरकारी यंत्रणा साफ अपयशी ठरली आहे. अनेक कंपन्यांमध्ये वायूप्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजनाच केल्या गेलेल्या नाहीत, असे पुढे आले आहे.
शुद्ध हवा ही काही आरोग्याची चोचले पुरवणारी गोष्ट नसून ती नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे; पण, कंपन्यांच्या बेपर्वाईमुळे हा अधिकारच हिरावला जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीने लक्ष घातले नाही तर लाखो रहिवाशांचे आरोग्य आणखी धोक्यात येऊ शकते. त्यांचे जगणे मुश्कील होईल, अशा प्रतिक्रिया या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
मध्यरात्री 1 ते पहाटेच्या सुमारास उग्र वास येतो. धुक्यासारखे दृश्य दिसत असले तरी ते प्रदूषणच आहे. डोळ्यांची जळजळ हे नेहमीचे दुखणे झाले आहे. विविध रासायनिक कंपन्यांमुळे चेंबूरकरांचा श्वास गुदमरलेला असतो. शासनाने याकडे लक्ष देऊन वायू प्रदूषणाची समस्या सोडवावी.गणेश बागवे, स्थानिक रहिवासी