मुंबई: मुंबईतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर वायू प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेच्या ‘एन’ विभागामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे.
या विभागाच्या कार्यक्षेत्रातील सात रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) कारखान्यांमध्ये वायू प्रदूषण नियंत्रणाच्या उपाययोजनांमध्ये त्रुटी आढळून आल्याने संबंधित कारखान्यांना दुसऱ्यांदा इशारा देण्यात आला आहे. या त्रुटी सात दिवसांत दूर न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिकेने दिला आहे.
‘एन’ विभागाच्या कार्यक्षेत्रात एकूण सात आरएमसी कारखाने कार्यरत आहेत. या सर्व कारखान्यांना वायू प्रदूषण प्रतिबंधक मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याबाबत ५ ऑक्टोबर २०२६ रोजी पत्राद्वारे निर्देश देण्यात आले होते.
त्यानंतर, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आलेल्या स्थळ पाहणीदरम्यान वाहनांचे टायर धुण्याची व्यवस्था, कारखान्यांभोवती हिरव्या कापडाचे आच्छादन, धूळ नियंत्रणासाठी फॉगिंग व पाण्याची फवारणी तसेच परिसरातील स्वच्छता यांसारख्या आवश्यक उपाययोजनांमध्ये त्रुटी आढळून आल्या.
यापूर्वी निर्देश देऊनही संबंधित कारखान्यांकडून आवश्यक उपाययोजनांची समाधानकारक अंमलबजावणी करण्यात आलेली नसल्याने, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी सातही आरएमसी कारखान्यांना द्वितीय इशारा पत्रे बजावण्यात आली आहेत. तसेच, केलेल्या उपाययोजनांचा अनुपालन अहवाल छायाचित्रांसह सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
या प्रकरणाची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही देण्यात आली आहे. विहित मुदतीत आवश्यक उपाययोजना करून नियमांचे पालन न केल्यास संबंधित आरएमसी प्लांटविरुद्ध लागू कायद्यांतील तरतुदींनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे ‘एन’ विभागामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
वायू प्रदूषण नियमांच्या अंमलबजावणीवर भर
नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी वायू प्रदूषण नियंत्रणाच्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर बृहन्मुंबई महानगरपालिका भर देत असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात येणार आहे.