मुंबई: मुंबईवर प्रदूषणाचे ढग कायम असून सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) बुधवारी १७९ वर गेला. मागील चार दिवसांपासून मुंबईकरांचा श्वास जास्तच कोंडला गेला आहे. शनिवार (१७०), रविवार (१७२), सोमवार (१८२) आणि मंगळवार (१९१) असा एक्यूआयचा चढता आलेख आहे. बुधवारी त्यात किंचित घट झाली तरी प्रदूषणाचे प्रमाण हे आरोग्यासाठी घातक कॅटेगरीमध्ये आहे.
पावसाळ्यानंतरचे थंड हवामान आणि हिवाळ्यातील वातावरणीय स्थितीमुळे प्रदूषके जमिनीच्या जवळ अडकून राहत असल्याने तसेच किनारपट्टीवर आणि शहरी भागांत वाऱ्याचा वेग कमी असल्याने धूर व प्रदूषके विखुरली जात नसल्याने प्रदूषण वाढले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये सुरू असलेले लोकोपयोगी प्रकल्प तसेच बेसुमार सुरू असलेल्या बांधकामांतून उडणारी धूळ, वाहनांतून होणारे उत्सर्जन आणि सण-उत्सवांच्या काळातील किंवा मोसमी घडामोडींमुळे निर्माण होणारा धूर या सर्वांमुळे हवेत तयार झालेले धुरकेही आर्थिक राजधानीतील वायू प्रदूषणाला कारणीभूत आहे.
किमान तापमान विशीखाली; थंडीची चाहूल
किमान तापमान विशीखाली आल्याने थंडीची चाहूल लागली आहे. पुढील काही दिवसांमध्ये गारठा वाढण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे.
सांताक्रूझ वेधशाळेमध्ये बुधवारी किमान १९ आणि कमाल ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गुरुवारी (१८/३५ अंश सेल्सिअस) किमान तापमानात आणखी घट अपेक्षित आहे. किमान तापमान सरासरी १८ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. मुंबईला सध्या धुक्याने वेढले आहे. गुरुवारी सुद्धा त्याचीच पुनरावृत्ती अपेक्षित आहे.
प्रदूषणाचे प्रमुख स्पॉट
कन्नमवार नगर १९५
जुहू तारा १८९
दहिसर १८८
चारकोप १८७
बोरीवली/चेंबूर १८६
विलेपार्ले/
वाशी/ चांदिवली १८५
गोराई १८४
हिरानंदानी १८२
वांद्रे पश्चिम १८१