FDA Action Mumbai : कॅफे आयडियल, नॅचरल्ससह ९ हॉटेल्सचे परवाने निलंबित

एफडीएची कारवाई; मियां कबाब्समध्ये मेनू कार्डवर अवतरले जिवंत झुरळ, तर बायरूटमध्ये उंदरांचा वावर
FDA Action Mumbai
FDA Action Mumbaipudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : दक्षिण मुंबईतील नामांकित उपाहारगृहांमधील अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन उघड झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने १७ नोव्हेंबर रोजी मोठी कारवाई केली. यामध्ये दक्षिण मुंबईतील चेतना, कॅफे आयडियल, बायरूट, मियां कबाब्स, नॅचरल आइस्क्रीम यांसह नऊ नामांकित उपाहारगृहांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे दक्षिण मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

कॅफे आयडियलच्या स्वयंपाकघरात छतावरील प्लास्टर निघालेले, उघड्या विद्युत तारा आणि कचऱ्याच्या भरलेल्या पिशव्या आढळल्या. कच्चे आणि शिजवलेले मांसाहारी पदार्थ एकत्र उघडे ठेवण्यात आले होते. चेतना रेस्टॉरंटमध्ये गंजलेल्या रॅकवर अन्नसाठा, फ्रिजचे खराब गॅस्केट, तुटलेल्या फरशा आणि सांडपाणी थेट जमिनीवर सोडल्याचे आढळले.

FDA Action Mumbai
Vadhavan Port Protest : वाढवण बंदर विरोधी आंदोलन पेटले; ट्रक अडवले, आंदोलकांची धरपकड

मियां कबाब्समध्ये ग्राहकांच्या टेबलावरील मेनू कार्डवर जिवंत झुरळ आढळले. कच्चे चिकन १३ अंश सेल्सिअस तापमानात ठेवले होते. अन्नसुरक्षेच्या नियमानुसार ते चार अंश किंवा त्यापेक्षा कमी तापमानात ठेवणे आवश्यक आहे. कच्चे मॅरिनेटेड कबाब शिजवलेल्या कबाबच्या वर ठेवण्यात आले होते. बायरूटमध्ये गंजलेल्या चिलरमध्ये ठेवलेले पदार्थ, उघडी गटारे आणि अस्वच्छ परिसर आढळला. नॅचरल आइस्क्रीमच्या फ्रीझरमध्ये आइस्क्रीम उघडे ठेवले होते. उत्पादन आणि मुदत दिनांकाची लेबले नव्हती.

श्रीयोग रेस्टॉरंटमध्ये अन्नपदार्थ कचऱ्याजवळ जमिनीवर ठेवलेले होते, तर कामगार उघड्या हातांनी अन्न हाताळत होते. गुप्ता फ्रूट ज्यूस सेंटर, प्रकाश डोसा आणि सौरभ हॉटेल्समध्येही अन्नसाठवणूक, स्वच्छता आणि कीटक नियंत्रणाबाबत त्रुटी आढळल्या. या नऊ आस्थापनांचे परवाने अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत निलंबित करण्यात आले आहेत.

FDA Action Mumbai
Thane Development : शाळा, आरोग्य केंद्र आधुनिकीकरणासाठी साडेपाचशे कोटींचा आराखडा

मुंबई, ठाण्यात १२ आस्थापनांवर कारवाई

ठाणे विभागातील ब्लिंक कॉमर्स, ब्रोड्यामा फूड्स आणि सागर स्वीट अँड बेकरी या तीन आस्थापनांचेही परवाने निलंबित करण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबई आणि ठाणे मिळून एकूण १२ अन्न आस्थापनांवर परवाना निलंबनाची कारवाई झाली आहे. बोरिवली पश्चिमेतील ओल्ड एमएचबी कॉलनी येथील गणेश पान बिडी शॉपमधून विक्रीसाठी ठेवलेला आठ हजार ७२८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नऊ नमुने घेण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.