Mumbai Ahmedabad highway Pudhari
मुंबई

Mumbai Ahmedabad highway: मुंबई–अहमदाबाद महामार्ग ठरतोय मृत्यूचा सापळा

अवघ्या 11 महिन्यांत 164 अपघात; निष्काळजीपणामुळे अनेक निष्पापांचे बळी

पुढारी वृत्तसेवा

विरार : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी हा मार्ग दिवसेंदिवस जीवघेणा ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. गेल्या 11 महिन्यांच्या कालावधीत या महामार्गावर तब्बल 164 अपघात घडले असून, त्यात अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निष्काळजी कारभारामुळेच हा महामार्ग ‌‘मृत्यूचा सापळा‌’ बनत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. मुंबई ते अहमदाबाद या सुमारे 590 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, काम सुरू असतानाच योग्य नियोजनाचा अभाव अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि कामाची संथ गती यामुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे, उंच-खाच, अचानक वळणे, अपुरी दिशा दर्शक फलक व्यवस्था तसेच अपूर्ण संरक्षक भिंती ही मोठी जोखीम ठरत आहेत.

विशेषतः वसई-विरार परिसरात महामार्गावरील वाहतूक दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत चालली आहे. अवजड वाहनांची प्रचंड वर्दळ, वेगमर्यादेचे उल्लंघन, रात्री अपुरी प्रकाश व्यवस्था आणि वाहतूक नियंत्रणाचा अभाव यामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. काही ठिकाणी सेवा रस्ते अपूर्ण असल्याने स्थानिक वाहनचालकांना थेट महामार्गावरून प्रवास करावा लागत आहे, ज्यामुळे जीवितहानीची शक्यता अधिक वाढते.

अपघातानंतर तात्पुरती डागडुजी

स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी वारंवार तक्रारी करूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. केवळ काम सुरू असल्याचे फलक लावून जबाबदारी झटकली जात असल्याचा आरोप होत आहे. अपघातानंतर तात्पुरती डागडुजी केली जाते, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने परिस्थिती ‌‘जैसे थे‌’च राहते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT