Mumbai Ahmedabad Bullet Train Pudhari
मुंबई

First Undersea Rail Tunnel: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मोठा टप्पा! भारतातील पहिल्या पाण्याखालच्या रेल्वे बोगद्याचे काम सुरू

India first underwater rail tunnel: बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घणसोली येथे दुसरे टीबीएम कार्यरत

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी महाराष्ट्रातील सावली (घणसोली) येथून विक्रोळीच्या दिशेने दुसऱ्या टनेल बोरिंग मशीनने (टीबीएम) शनिवारपासून भुयारीकरणाचे काम सुरू केले आहे. एकूण १० किमी अंतरापैकी ७ किमीचा भाग ठाणे खाडीखालील बोगदा असेल. कोणत्याही रेल्वे मार्गासाठी असणारा हा भारतातील पहिला पाण्याखालचा बोगदा ठरेल.

या प्रकल्पाच्या एकूण २१ किमी लांबीच्या भूमिगत बोगद्याच्या भागापैकी मुंबईतील सावली आणि वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) दरम्यानचा १६ किमीचा भाग टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) वापरून तयार केला जाईल.

पहिल्या टीबीएमने ५ जुलैला विक्रोळीकडून बीकेसीच्या दिशेने आपली ६ किमीची मोहीम सुरू केली आहे. उर्वरित ५ किमीचा भाग एनएटीएम पद्धतीने आधीच पूर्ण झाला आहे. शनिवारी कार्यरत करण्यात आलेले टीबीएम हे भारतातील रेल्वे बोगदा बांधणीसाठी आतापर्यंत वापरल्या गेलेल्या सर्वात मोठ्या मशीनपैकी एक आहे.

यामध्ये १३.६ मीटर व्यासाचे एक अवाढव्य कटरहेड आहे, त्याचे वजन ३२०० टन आहे आणि त्याची एकूण लांबी ९६ मीटर आहे. प्रगत सेमी-कंटिन्युअस ॲडव्हान्स (एससीए) प्रणालीसह एकत्रित केलेले हे टीबीएम, बोगद्याच्या भागाचे रिंग-बिल्डिंग ऑपरेशन्स आणि बोगद्याचे उत्खनन एकाच वेळी आणि सुरक्षितपणे करू शकते.

पाणी जाऊ नये म्हणून व्यवस्था

टीबीएमच्या लाँचिंगसाठी सावली येथे जमिनीच्या पातळीखाली ३९ मीटर खोल शाफ्ट म्हणजेच १२ मजली इमारतीइतका खोल खड्डा तयार करण्यात आला आहे. शाफ्टमधील मर्यादित जागेचा योग्य वापर करण्यासाठी, टीबीएमचे भाग सुटे करून खाली उतरवण्यात आले.

गॅन्ट्रीज आधी खाली उतरवण्यात आल्या आणि आधीच बांधलेल्या एनएटीएम बोगद्याच्या आत ढकलल्या गेल्या. त्यानंतर मेन शील्ड आणि कटरहेड खाली उतरवण्यात आले. बोगद्यात पाणी शिरू नये म्हणून, बोगद्याच्या अस्तराला हायड्रोफिलिक सील्ससह डबल-लेअर इथिलीन प्रोपिलिन डायन मोनोमर (ईपीडीएम) गॅस्केट्स वापरून संरक्षित केले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT