मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात पालघर जिल्ह्यातील दुसऱ्या माऊंटन टनेलचे भुयारीकरण मंगळवारी पूर्ण झाले. या बोगद्याची लांबी 454 मीटर आणि रुंदी 14.4 मीटर आहे. या बोगद्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पातील अप आणि डाऊन ट्रॅक टाकण्यासाठी जागा उपलब्ध झाली आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यात एका महिन्याच्या कालावधीत हा दुसरा टनेल ब्रेकथ्रू आहे; पहिला एमटी-5 या बोगद्याचे भुयारीकरण 2 जानेवारी 2026 रोजी झाले होते.
एमटी - 6 चे खोदकाम दोन्ही टोकांहून न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत (एनएटीएम) वापरून केले गेले आहे. ही एक अत्याधुनिक ड्रिल आणि नियंत्रित स्फोट पद्धत आहे. यामुळे खोदकाम 12 महिन्यांत पूर्ण झाले.
पालघर जिल्ह्यासारख्या गुंतागुंतीची भौगोलिक परिस्थिती असणाऱ्या परिसरात बोगदा खणण्यासाठी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत (एनएटीएम) उपयुक्त ठरते. येथे टनेल बोरिंग मशीन वापरून काम करता येत नाही. या प्रक्रियेसाठी फार जड यंत्रसामग्री आवश्यक नसते आणि शॉटक्रिटिंग, रॉक बोल्ट्स आणि लॅटिस गिर्डर्सचा वापर करून प्रत्यक्ष वेळेत आवश्यक सुधारणा करता येतात. विविध भू-तांत्रिक उपकरणांचा वापर, प्रत्यक्ष वेळेतील निरीक्षण,
कार्यक्षम अग्निसुरक्षा उपाय, योग्य वायुविजन आणि नियंत्रित प्रवेश व्यवस्था यांमुळे बोगद्याच्या आत काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेची खात्री असते. या प्रकल्पाचा सर्वाधिक लांबीचा नदी पूल वैतरणा नदीवर पिअर स्तरावर पोहोचला आहे, तर उल्हास आणि जगणीसारख्या इतर प्रमुख नद्यांवर पायाभरणीचे काम सुरू आहे. पालघर जिल्ह्यात एकूण 7 माउंटन टनेल्सचे काम सुरू आहे.