मुलीच्या अपघाती मृत्यूप्रकरणी रिक्षाचालकास अटक  Pudhari File Photo
मुंबई

Mumbai Accident : मुलीच्या अपघाती मृत्यूप्रकरणी रिक्षाचालकास अटक

मालाडच्या मालवणी, जनकल्याणनगर, लिब्रा सहकारी सोसायटीजवळ अपघात

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : भरवेगात रिक्षा चालविण्याच्या प्रयत्नात रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षाने डिव्हायडरला धडक दिल्याने फरहीन युसूफ खान या पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अपघाताची नोंद होताच अकरा दिवसानंतर या गुन्ह्यांतील आरोपी रिक्षाचालक सुमीत शरद गाडे याला मालवणी पोलिसांनी अटक केली. हा अपघात 10 नोव्हेंबरला रात्री अकरा वाजता मालाडच्या मालवणी, जनकल्याणनगर, लिब्रा सहकारी सोसायटीजवळ झाला होता.

युसूफ नासीर खान हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत मालाडच्या मालवणी परिसरात राहत असून सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. 10 नोव्हेंबरला रात्री ते त्यांची पत्नी झरीना आणि पाच महिन्यांची मुलगी फरहीन यांच्यासोबत चारकोप, एकतानगर, भूमी मार्ट येथून मालवणीच्या दिशेने जात होते.

रात्री अकरा वाजता ही रिक्षा मालवणीतील जनकल्याणनगर, लिब्रा सहकारी सोसायटीजवळ येताच रिक्षाचालकाने भरवेगात रिक्षा चालविण्याचा प्रयत्न केला होता. त्यात त्याच्या रिक्षावरील नियंत्रण सुटले आणि त्याने रिक्षाला डिव्हायडरला जोरात धडक दिली होती. त्यामुळे रिक्षा पलटी होऊन त्यांची पत्नी झरीना आणि पाच महिन्यांची मुलगी फरहीन या दोघीही जखमी झाल्या होत्या. जखमी झालेल्या या दोघींनाही मालवणीतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असताना 11 नोव्हेंबरला सकाळी साडेसहा वाजता फरहीनचा मृत्यू झाला होता, तर त्यांच्या पत्नीवर उपचार सुरु होते.

याप्रकरणी मालवणी पोलिसांनी रिक्षाचालक सुमीत गाडेविरुद्ध हलगर्जीपणाने रिक्षा चालवून एका पाच महिन्यांच्या मुलीच्या मृत्यूस तर तिच्या आईला गंभीर दुखापत होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत शुक्रवार 21 नोव्हेंबरला म्हणजेच अकरा दिवसांनंतर आरोपी सुमीत गाडे याला मालवणी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT