Crime pudhari photo
मुंबई

AC Local Train Attack : झोपमोड केल्याने प्रवाशाचा रेल्वे अधिकाऱ्यावर हल्ला

बोरिवली स्थानकातील घटना; प्रवाशाला अटक

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : एसी लोकलच्या महिला डब्यात झोपलेल्या प्रवाशाला बाहेर जाण्यास सांगितल्याच्या रागातून त्याने वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यावर मोबाईल फोनने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात संबंधित अधिकाऱ्याच्या डोक्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाला.

याप्रकरणी बोरीवली रेल्वे पोलिसांनी लोअर परळ येथील रहिवासी हर्षिल भरतकुमार जैन या प्रवाशाला अटक केली आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चर्चगेटवरून सकाळी ७ वाजता सुटलेली एसी लोकल बोरीवली स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर आली होती. यावेळी ट्रेन एक्झामिनर याकूब शेख यांना महिला डब्यात एक पुरुष प्रवासी झोपलेला दिसला. ते त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असतानाच वरिष्ठ ट्रेन मॅनेजर प्रियेश सूर्यभान गिरी तिथे पोहोचले.

रेल्वे कर्मचाऱ्यांनी झोपलेल्या हर्षिल जैनला हा महिलांचा डबा असल्याचे सांगून सामान्य डब्यात जाण्यास वा खाली उतरण्यास सांगितले. मात्र, हर्षिलने कर्मचाऱ्यांचे ऐकण्याऐवजी त्यांच्याशी हुज्जत घालत शिवीगाळ सुरू केली. कर्मचाऱ्यांनी त्याला डब्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत हर्षिलने हातातील मोबाईल फोनने प्रियेश गिरी यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. यामध्ये गिरी यांच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला.

दरम्यान, जखमी अवस्थेतही प्रियेश गिरी आणि याकूब शेख यांनी हर्षिलला डब्यातून बाहेर काढले आणि रेल्वे कंट्रोल रूमला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच आरपीएफचे हेड कॉन्स्टेबल सुनील नरवाल आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान विपुल पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हर्षिल जैन याला ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला बोरीवली रेल्वे पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT